इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याची कसोटी क्रिकेटमधील प्रतीक्षित पुनरागमन पुन्हा पुढे ढकलले गेले आहे. भारताविरुद्ध २ जुलैपासून एजबॅस्टनमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने कोणताही बदल न करता पहिल्या सामन्यातलीच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवली आहे.
जोफ्रा आर्चरला २०२१ नंतर प्रथमच इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळाले होते. मात्र कोहनीची दुखापत आणि पाठीमागील फ्रॅक्चर यामुळे तो सातत्याने संघाबाहेर राहिला आहे. सोमवारी पारिवारिक कारणामुळे तो सराव सत्रात सहभागी होऊ शकला नाही, आणि तो मंगळवारीच संघात पुन्हा सामील होईल.
इंग्लंडने हेडिंग्ले कसोटीत भारताविरुद्ध ५ गड्यांनी विजय मिळवला होता. त्या विजयी संघावर विश्वास ठेवतच कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या कसोटीसाठी तीच संघरचना कायम ठेवण्यात आली आहे.
इंग्लंडने जर एजबॅस्टनचा सामना जिंकला, तर १० जुलैपासून लॉर्ड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतच मालिका जिंकण्याची संधी मिळणार आहे.
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नसल्यामुळे क्रिस वोक्सला आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा कसोटी खेळण्याची संधी मिळणार आहे. ३६ वर्षीय वोक्सने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध आपल्या होम ग्राउंडवर प्रभावी कामगिरी केली आहे.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन (दुसरी कसोटी):
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
