क्रिकेट समीक्षक म्हणून आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने स्वतःचा एक अमीट ठसा उमटविणारे द्वारकानाथ संझगिरी यांचे गुरुवारी निधन झाले. गेले अनेक दिवस ते दुर्धर आजाराशी लढा देत होते. मात्र गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
वयाच्या ७४ व्या वर्षी संझगिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर त्यांची ही झुंज संपली.
मध्यंतरी मुंबई स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबरच ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांचा सत्कार त्या कार्यक्रमात झाला होता. त्यावेळी ते या आजाराशी झुंजत होते. तरीही ते उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
संझगिरी यांनी स्वतःची एक खास शैली विकसित केली होती, त्या शैलीच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेटचे कधी हसवणारे, कधी चिमटे काढणारे विश्लेषण केले. सचिन तेंडुलकर हा त्यांचा विशेष आवडता खेळाडू होता. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीवरही त्यांनी भरपूर लेखन केले. मुळात ते पालिकेत अभियंता म्हणून कार्यरत असताना क्रिकेटवर लिहित असत. त्यांच्या या शैलीचे महाराष्ट्रात असंख्य चाहते तयार झाले. एखाद्या खेळाडूच्या कामगिरीची विविध घटनांशी तुलना करून ते मार्मिक विश्लेषण करत असत. त्यामुळे वाचकच नव्हेत तर क्रिकेटपटूही त्यांच्या लेखणीवर फिदा होते. केवळ लेखक म्हणून नव्हे तर अनेक देशीविदेशी क्रिकेटपटूंशी संझगिरी यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांच्या घरीही या क्रिकेटपटूंचे येणेजाणे असे.
हे ही वाचा:
हद्दपारी यापूर्वीही होती, बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांना मायदेशी घेणे ही जबाबदारी!
हमासने समलैंगिक सदस्यांना फाशी दिली, इस्रायली पुरुष बंधकांवरही झाले अत्याचार!
पतीला वाचवण्यासाठी पत्नीचे धाडसी पाऊल
दंतेवाडात पाच महिलांसह सहा माओवाद्यांचे आत्मसमर्पण !
संझगिरी यांनी गाण्याच्या कार्यक्रमांचेही सुंदर सूत्रसंचालन केले. सिनेमा या विषयावर त्यांचे विशेष प्रेम होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करून त्यात सिनेमा व क्रिकेट क्षेत्रातील बुजुर्गांना गौरविण्याचा सिलसिला त्यांनी सुरू ठेवला होता.
१९७० च्या दशकात त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. नंतर अनेक नामांकित वर्तमानपत्रात त्यांनी स्तंभलेखन सुरू केले. याचदरम्यान त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धांचे वार्तांकन केले. विश्वचषक स्पर्धांचे लाइव्ह वर्णन त्यांनी केले. ते लेख प्रमुख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आणि त्यांना लोक चवीन वाचत असत.
द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ७ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संझगिरी यांनी लिहिलेली पुस्तके
क्रिकेट
शतकात एकच – सचिन
चिरंजीव सचिन
दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी
खेलंदाजी
बोलंदाजी
चॅम्पियन्स
चित्तवेधक विश्वचषक २००३
क्रिकेट कॉकटेल
क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स
कथा विश्वचषकाच्या
लंडन ऑलिम्पिक
पॉवर प्ले
स्टंप व्हिजन
संवाद लिजंड्सशी
स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा
थर्ड अंपायर
इंग्लिश ब्रेकफास्ट
प्रवासवर्णन
फिश अँड चिप्स
मुलूखगिरी
फिरता – फिरता
पूर्व अपूर्व
फाळणीच्या देशात
भटकेगिरी
ब्लू लगून
माझी बाहेरख्याली
जीन अँड टॉनिक
चित्रपट आणि कलाकार
[संपादन]
फिल्मगिरी
तिरकटधा
ब्लॅक अँड व्हाईट
वो भुली दास्तान
आम्हांला वगळा
देव आनंद
लतादीदी
प्यार का राग सुनो
आशा भोसले, एक सुरेल झंझावात
व्यक्तीचित्रण
[संपादन]
अफलातून अवलिये / दशावतार
वल्ली आणि वल्ली
विनोद
[संपादन]
खुल्लमखिल्ली
स. न. वि. वि. /खुला खलिता
सामाजिक विषय
[संपादन]
तानापिहिनिपाजा
दादर – एक पिनाकोलाडा
रिव्हर्स स्वीप
वेदनेचे गाणे