छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवायांना यश मिळत आहे. दंतेवाडा येथे सहा नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘लोन वरातू’ (घरी परत या) मोहिमेमुळे नक्षलवाद्यांना प्रेरणा मिळत असल्याने ते आत्मसमर्पण करत आहेत.
हुंगा उर्फ हरेंद्र कुमार माडवी (३०), आयते मुचाकी (३८), शांती उर्फ जिम्मे कोरम (२८), हुंगी सोडी (२९), हिडमे मरकाम (३०) आणि जोगी सोडी (३५), अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी मालंगर एरिया कमिटीच्या बुरगम पंचायतीत सक्रिय होते.
या नक्षलवाद्यांवर रस्ते खोदणे, नक्षलवादी बॅनर, पोस्टर लावणे आणि इतर घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मसमर्पण केल्यानंतर, नक्षलवाद्यांना राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ दिला जाईल. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना २५,००० रुपयांची आर्थिक मदत, तीन वर्षांसाठी मोफत जेवण आणि निवास, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, शेतीची जमीन आणि इतर सुविधा दिल्या जातील. पोलिसांनी सांगितले की, लोन वरातू मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २१२ इनामी नक्षलवाद्यांसह ९०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
हे ही वाचा :
काश्मीर हा पाकिस्तानचा, हिसकावून घेऊ! दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा बरळला
पाकचे पंतप्रधान म्हणतात, काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचेत
निदर्शकांनी बांगलादेशला स्वातंत्र्य देणाऱ्या शेख मुजीबुरहमान यांचे घर जाळले