29 C
Mumbai
Sunday, August 9, 2026
घरविशेषचाकरमान्यांनो खुशाल जावा; आपल्या गावा

चाकरमान्यांनो खुशाल जावा; आपल्या गावा

Google News Follow

Related

गणेशोत्सवाची चाहूल लागली की लाखो चाकरमान्यांच्या मनात एकच ओढ जागी होते… “कधी एकदा आपल्या गावच्या गणरायाच्या चरणी पोहोचतो!” डोळ्यासमोर गावाकडचा रस्ता, कानात घुमणारा ढोल-ताशांचा आवाज आणि मनात गणरायाच्या दर्शनाची ओढ… अशाच भावनेने लाखो चाकरमानी दरवर्षी कोकणाच्या दिशेने निघतात. पण या आनंदाच्या प्रवासात मुंबई- गोवा महामार्गाने अनेक वर्षे त्यांची मोठी परीक्षा घेतलीये. गाव गाठण्यापेक्षा महामार्ग पार करण्याचीच जास्त चिंता वाटायची. ‘किती तास लागतील?’, ‘खड्डे किती असतील?’, ‘कोंडीत अडकू का?’… असे असंख्य प्रश्न मनात घेऊनच प्रवास सुरू व्हायचा.

मात्र, यंदा अनेक वर्षांनंतर हे चित्र बदलताना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे बहुतांश काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आले असून, उर्वरित काही भागांमध्येही वेगाने काम सुरू आहे. मग खरोखरच मुंबई-गोवा महामार्ग किती बदलला आहे? अजून कोणत्या ठिकाणी काम सुरू आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर आणि जलद होणार का?

मुंबई-गोवा महामार्ग… महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहिलेल्या महामार्गांपैकी एक. पण या महामार्गाला इतकं महत्त्व का आहे? दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात याच रस्त्याची चर्चा सर्वाधिक का होते? कारण हा केवळ मुंबई आणि गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ नाही, तर तो संपूर्ण कोकणाची जीवनवाहिनी आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना मुंबईशी जोडणारा हा प्रमुख दुवा आहे. कोकणातील लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा, रोजगाराचा आणि विकासाचा हा अविभाज्य भाग बनला आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गाचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर परिसरात राहणारे लाखो चाकरमानी याच मार्गाने आपल्या गावाकडे रवाना होतात. त्याचबरोबर कोकणातील पर्यटन, हापूस आंबा आणि काजू उद्योग, मत्स्यव्यवसाय, स्थानिक व्यापार तसेच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर याच महामार्गावर अवलंबून असते. त्यामुळे हा केवळ एक रस्ता नसून, कोकणाच्या अर्थव्यवस्थेची आणि लाखो कुटुंबांच्या आयुष्याची जीवनवाहिनी आहे.

या महामार्गाकडे पाहताना एक मोठी अपेक्षा होती… कोकणाला जोडणारा हा रस्ता केवळ प्रवासाचा मार्ग न राहता विकासाचा महामार्ग बनेल. मुंबई आणि कोकणातील अंतर कमी करेल, उद्योग-व्यवसायाला चालना देईल आणि लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करेल, असं स्वप्न पाहिलं जात होतं. पण प्रत्यक्षात हे स्वप्न पूर्ण होण्याचा प्रवास मात्र सोपा नव्हता. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अनेक वर्षांचा संघर्ष, अडचणी आणि प्रतीक्षा यांचा सामना करावा लागला.

अर्थात, इतका महत्त्वाचा महामार्ग असल्यामुळे तो आधुनिक, सुरक्षित आणि वेगवान असणं तितकंच आवश्यक होतं. पण काही वर्षांपूर्वीचं वास्तव वेगळंच होतं. कोकणातील घाट, नागमोडी वळणांचे रस्ते, वाढती वाहतूक, वारंवार होणारे अपघात, पावसाळ्यातील खड्डे आणि चिखल, तर उन्हाळ्यात धुळीचे ढग… या सगळ्यांमुळे मुंबई-गोवा प्रवास अनेकदा वेळखाऊ आणि कसरतीचा ठरत होता. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी सातत्याने जोर धरू लागली.

याच पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकणाच्या विकासाला नवी गती देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिलं जात होतं. मात्र, घोषणा झाल्यानंतरही कामाचा प्रवास सोपा नव्हता. भूसंपादन, वन आणि पर्यावरणविषयक मंजुरी, मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, कंत्राटदारांमधील बदल, आर्थिक अडथळे आणि विविध तांत्रिक आव्हानांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे संथ गतीने पुढे सरकत राहिला.

मात्र, या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता परिस्थिती बदलताना दिसतय. अनेक महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले असून उर्वरित कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर बदल प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे.

मुंबईनजीकच्या पनवेलपासून गोवा सीमेपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची महाराष्ट्रातील एकूण लांबी सुमारे ४८५ किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या मार्गाचे चौपदरीकरण एका टप्प्यात पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची विभागणी १२ स्वतंत्र पॅकेजमध्ये करण्यात आली. या प्रकल्पातील पहिल्या पॅकेजचे काम डिसेंबर २०११ मध्ये सुरू झाले आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित भागांवरही कामाला सुरुवात झाली.

सुरुवातीच्या काळात भूसंपादन, पर्यावरणविषयक मंजुरी, मुसळधार पाऊस, कंत्राटदारांमधील बदल आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाचा वेग मंदावला. मात्र, गेल्या काही महिन्यांत कामाला मोठी गती मिळाली आणि आता हा प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

उपलब्ध सरकारी माहितीनुसार, महाराष्ट्रातील ४८५ किलोमीटरपैकी सुमारे ४६५ किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच, संपूर्ण प्रकल्पातील बहुतांश काम पूर्ण झाले असून केवळ सुमारे २० किलोमीटर अंतरावरील काम बाकी आहे. या उर्वरित भागात काही उड्डाणपूल, मोठे पूल आणि इतर संरचनांची कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत.

यामुळे अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग आता प्रत्यक्षात नव्या रूपात दिसू लागला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होण्याबरोबरच कोकणातील पर्यटन, व्यापार, उद्योग, शेतीमालाची वाहतूक आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

आता प्रकल्पाची व्याप्ती आणि कामाची सद्यस्थिती समजून घेतली. पण प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करताना नेमका काय अनुभव येतो? कोणत्या भागात रस्ता उत्कृष्ट झाला आहे, कुठे अजून काम सुरू आहे आणि कोणत्या ठिकाणी वाहनचालकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे?

आता आपण प्रवास करत करत मुंबईपासून गोवा सीमेपर्यंतचा प्रवास अनुभवूया आणि पाहूया की आज या महामार्गावर नेमकं चित्र कसं आहे. सुरुवात करूया पनवेलपासून. मुंबईची धावपळ हळूहळू मागे पडते आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आपल्याला कोकणाच्या दिशेने घेऊन जातो. काही वर्षांपूर्वी इथून पुढचा प्रवास म्हणजे वाहनांच्या लांबलचक रांगा, सिग्नल आणि संथ गती अशीच ओळख होती. मात्र आज रुंद झालेल्या महामार्गामुळे प्रवासाची सुरुवातच अधिक मोकळी आणि सुखकर वाटते.

थोड्याच वेळात आपण पेण परिसरात पोहोचतो. या टप्प्यातील बहुतांश चौपदरीकरण पूर्ण झाल्यामुळे वाहनांचा वेग चांगला टिकून राहतो. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू असलं, तरी त्याचा प्रवासावर फारसा परिणाम होत नाही. मात्र काम सुरू असलेल्या भागातून जाताना वेगमर्यादेचं पालन करणं गरजेचं आहे.

पूर्वी गणेशोत्सवाच्या काळात याच मार्गावर तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागायचं. लहान मुलांचा कंटाळा, उन्हाचा त्रास आणि गाव कधी येणार याची ओढ… हा अनुभव अनेक चाकरमान्यांनी वर्षानुवर्षे घेतला आहे. आज मात्र रस्त्याची क्षमता वाढल्याने प्रवासाची सुरुवात पूर्वीपेक्षा नक्कीच अधिक आरामदायी झाली आहे.

यानंतर आपण नागोठणे आणि इंदापूरच्या दिशेने पुढे सरकतो. एकेकाळी खड्डे, धुळीचे ढग आणि सततची वाहतूक कोंडी यासाठी ओळखला जाणारा हा टप्पा आता बराच सुधारला आहे. तरीही नागोठणे परिसरात काही ठिकाणी खड्डे असल्याने वाहन चालवताना सावधगिरी आवश्यक आहे.

याच भागातील नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे वाहतूक जुन्या मार्गावरून सुरू आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने येथे काही वेळा वाहतूक मंदावते आणि विशेषतः गर्दीच्या दिवशी कोंडीचाही सामना करावा लागू शकतो.

नागोठणे पार केल्यानंतर सुकेळी खिंड सुरू होते. येथे मोठ्या प्रमाणात रम्बल स्ट्रिप्स बसवण्यात आल्या आहेत. उतारावर त्या उपयुक्त ठरत असल्या, तरी चढाच्या भागात सलग रम्बलर्समुळे वाहनांचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांनी या भागात अधिक दक्षता घ्यावी.

आता आपण माणगावच्या दिशेने येतो. गणेशोत्सवाच्या काळात हा टप्पा नेहमीच सर्वाधिक व्यस्त असतो. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीसोबतच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पालीमार्गे येणारी अनेक वाहनंही इथे येऊन मिळतात. त्यामुळे माणगाव शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगाव बायपासचं काम सुरू आहे. पावसामुळे कामाचा वेग काहीसा मंदावला असला, तरी गणेशोत्सवापूर्वी किमान एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते शक्य झाल्यास हजारो चाकरमान्यांचा बराच वेळ वाचू शकतो. मात्र शहरातील वाहतुकीचा ताण पूर्णपणे कमी होण्यासाठी बायपासचं काम पूर्ण होणं आवश्यक आहे.

माणगाव मागे पडताच आपण महाडच्या दिशेने निघतो आणि इथून पुढे कोकणाचं खरं सौंदर्य खुलायला सुरुवात होते. पहाटेच्या वेळी प्रवास करत असाल तर धुक्याची चादर, हिरव्यागार दऱ्या आणि डोंगररांगा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय बनवतात.

पुढे पोलादपूर आणि खेडच्या दिशेने जाताना घाटरस्ता सुरू होतो. अनेक ठिकाणी काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी डायव्हर्जनचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः मुसळधार पावसात या भागात अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. पोलादपूर गेल्यानंतर कशेडी बोगद्यामुळे आपण सुसाट जातो. कशेडी घाटाचे वळण आता बायपास झाले आहे. त्यानंतर आपण पोहोचतो खेडमध्ये. खेड गेल्यानंतर इथे फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुक संथ गतीेन होते. त्यानंतर भोस्ते घाटात काम सुरू आहे. या घाटात मुंबईच्या दिशेने येताना एक उतारावार खूप अवघड वळण आहे. त्यामुळे इथे भरपूर अपघात झाले आहेत. तो मार्ग वाढवण्याचे काम सुरू आहे.

थोड्याच वेळात आपण चिपळूणमध्ये पोहोचतो आणि इथंच आजही मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा अडथळा आहे. चिपळूण बायपासवरील पुलाचं काम अद्याप अपूर्ण असल्याने महामार्गावरील वाहतुकीला शहरातूनच मार्ग काढावा लागतो. स्थानिक आणि बाहेरील वाहनांची एकत्रित गर्दी झाल्याने येथे अनेकदा वाहतूक संथ होते. सध्याच्या कामाचा वेग पाहता गणेशोत्सवापूर्वी हा पूल सुरू होण्याची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे यंदाही चिपळूण हा संपूर्ण प्रवासातील सर्वाधिक वेळ घेणारा टप्पा ठरू शकतो.

चिपळूणनंतर गाडी पुन्हा वेग पकडते आणि आपण संगमेश्वरच्या दिशेने निघतो. काही महिन्यांपूर्वी रखडलेलं पुलाचं काम, खड्डे आणि डायव्हर्जन यामुळे हा भाग वाहनचालकांसाठी त्रासदायक होता. आता पुलाची एक लेन सुरू झाल्यामुळे वाहतुकीत मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र संगमेश्वर ते रत्नागिरीदरम्यान काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अजूनही समाधानकारक नसल्याने काळजीपूर्वक वाहन चालवणं गरजेचं आहे.

यानंतर आपण रत्नागिरीच्या हद्दीत प्रवेश करतो. नवीन रस्ते आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे प्रवास अधिक सहज झाला आहे. शहरालगत स्थानिक वाहतुकीचा ताण जाणवत असला, तरी शहर मागे पडताच पुन्हा एकदा कोकणाचं निसर्गसौंदर्य प्रवासाचा साथीदार बनतं. या टप्प्यावर प्रवासात वेगापेक्षा निसर्गाची साथ जास्त जाणवते. हिरवीगार झाडं, लाल मातीची घरं आणि शांत वातावरण गाव जवळ आल्याची चाहूल देऊ लागतं.

पुढचा टप्पा लांजाचा. बहुतांश रस्ता चांगला असला, तरी काही ठिकाणी सुरू असलेली कामं आणि किरकोळ खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो. त्यातच निवळी परिसरात मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याने विशेषतः गणपतीपुळेच्या दिशेने वळणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या भागासाठी थोडा अतिरिक्त वेळ राखून ठेवलेलाच बरा.

मात्र राजापूर गाठताच पुन्हा प्रवासाला वेग मिळतो. रुंद रस्ता, मजबूत पूल आणि डोंगर-दऱ्यांमधून जाणारा निसर्गरम्य मार्ग मन प्रसन्न करतो. अनेकांच्या मोबाईलवर याच टप्प्यात एक फोन जातो… “आम्ही आता जवळ आलोय.” त्या एका वाक्यात घराची ओढ, कुटुंबाला भेटण्याची उत्सुकता आणि गणरायाच्या दर्शनाची आतुरता दडलेली असते.

राजापूरनंतर कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीचा प्रवास तुलनेने अधिक सुरळीत होतो. चौपदरीकरणामुळे वाहनांना चांगला वेग मिळतो. मात्र सावंतवाडीत फ्लायओव्हरचं काम सुरू असल्याने काही ठिकाणी वाहतूक मंदावू शकते. हा टप्पा पार झाला की गोवा सीमेपर्यंतचा शेवटचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक जलद, आरामदायी आणि सुखद अनुभव देतो.

आता गोवा सीमा जवळ येते आणि त्यासोबतच अनेकांचा प्रवासही संपत आलेला असतो. पण कोकणात जाणाऱ्या प्रत्येकासाठी हा केवळ एका प्रवासाचा शेवट नसतो; तर आपल्या मातीशी, घराशी आणि गणरायाशी भेट होण्याची सुरुवात असते.

अर्थात, गणेशोत्सवाच्या काळात लाखो चाकरमानी आणि पर्यटक याच मार्गाने प्रवास करणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा ताण जाणवणं स्वाभाविक आहे. याशिवाय महामार्गावरील काही ब्लॅक स्पॉट्स, अपूर्ण सर्व्हिस रोड आणि सुरू असलेली कामं यामुळे काही ठिकाणी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यातच अनेक भागांत संरक्षक कुंपण नसल्यामुळे गाई-बैल अचानक रस्त्यावर येतात किंवा रस्त्यावरच बसलेले दिसतात. विशेषतः रात्रीच्या प्रवासात हा मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे सुरक्षित अंतर राखणं, वेगमर्यादेचं पालन करणं, समोरच्या रस्त्यावर सतत लक्ष ठेवणं आणि संयमाने वाहन चालवणं हेच सुखरूप प्रवासाचे खरे मंत्र आहेत.

हे ही वाचा:

चीप ते शिपपर्यंत सगळे तुम्हालाच करायचे आहे!

पेट्रोल दरवाढीविरोधात पाकिस्तानात संताप; प्रमुख शहरांमध्ये निदर्शने, रॅली

होर्मुज सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला

विंग कमांडर ‘हनी ट्रॅप’; पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप

एकंदरीत पाहिलं, तर मुंबई-गोवा महामार्ग आज नव्या रूपात उभा आहे. काही मोजके अपूर्ण टप्पे वगळता बहुतांश मार्ग आता रुंद, आधुनिक आणि अधिक सुरक्षित झाला आहे. अनेक वर्षे खड्डे, डायव्हर्जन आणि तासनतास चालणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बदनाम झालेला हा महामार्ग आता नव्या ओळखीने समोर येत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.

पण प्रत्येक विकासाच्या प्रवासात काही गोष्टी मिळतात, तर काही गोष्टी काळाच्या ओघात मागे राहतात… रस्ते बदलतात, प्रवास बदलतो; पण त्या प्रवासाशी जोडलेल्या भावना मात्र कायम मनात जिवंत राहतात. आणि म्हणूनच, या बदलाची एक हळवी बाजूही आहे.

एकेकाळी कोकणातले घाटरस्ते म्हणजे प्रवासाचा आत्माच असायचे. नागमोडी वळणं, उंच डोंगर, खोल दऱ्या, दुतर्फा डोलणारी झाडं आणि प्रत्येक वळणावर नव्यानं उलगडणारं कोकण… हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर निसर्गाला जवळून अनुभवण्याचा होता. घाट चढताना वाटणारी धडधड, वळणावरून समोर येणारं अप्रतिम दृश्य आणि त्या प्रवासाची एक वेगळीच मजा… आजही त्या प्रवासाच्या आठवणी अनेकांच्या मनात तितक्याच जिवंत आहेत.

याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कशेडी घाट. एकेकाळी कोकण प्रवासाची ओळख असलेला हा घाट आज आधुनिक बोगद्यामुळे काही मिनिटांत पार होतो. वेळ नक्कीच वाचतो, प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे आणि हा बदल आवश्यकही होता. पण त्या वळणांमधून दिसणारं कोकण, घाट चढताना जाणवणारा रोमांच आणि प्रवासाचा तो निवांतपणा… हे सगळं आता आठवणींचाच एक भाग बनलं आहे.

हेच चित्र महामार्गाच्या इतर अनेक भागांतही दिसतं. रस्ते अधिक रुंद, सरळ आणि वेगवान झाले; पण रस्त्याच्या कडेला डोलणारी झाडं, शांत घाटरस्ते आणि हळूहळू उलगडणारं कोकणाचं रूप आज पूर्वीसारखं अनुभवायला मिळत नाही. विकासाच्या या प्रवासात काही जुन्या आठवणी नकळत मागे राहिल्या, एवढंच.

पण विकास थांबून चालणार नाही. सुरक्षित, जलद आणि आधुनिक महामार्ग ही आजची गरज आहे. लाखो चाकरमान्यांचा वेळ वाचणार आहे, प्रवास अधिक सुखकर होणार आहे आणि कोकणाच्या विकासालाही नवी गती मिळणार आहे. मात्र या वेगासोबत कोकणाचा आत्मा, त्याचं निसर्गसौंदर्य आणि त्या मातीशी जोडलेल्या भावना कायम जपल्या गेल्या पाहिजेत. कारण कोकणात जाणारा रस्ता हा फक्त वाहतुकीचं साधन नसतो… तो वर्षभर मुंबईत कष्ट करणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या मातीकडे, आपल्या माणसांकडे घेऊन जाणारा भावनांचा प्रवास असतो. आणि म्हणूनच, हा प्रवास कितीही वेगवान झाला तरी त्यातल्या त्या जुन्या आठवणींचा सुगंध कायम राहणार आहे.

रस्ते बदलले, अंतर कमी झालं, प्रवास वेगवान झाला… पण आपल्या गावाकडे परतण्याची ओढ मात्र आजही तितकीच आहे. आणि कदाचित म्हणूनच, मुंबई-गोवा महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही, तर लाखो चाकरमान्यांच्या भावना, आठवणी आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्याला जोडणारी जीवनवाहिनी आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा