भारताची संपत्ती हडप करून देशातून पोबारा करणाऱ्यांविरुद्ध केंद्रीय तपास संस्था महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. परदेशात बसलेल्या या फरार आरोपींना पकडण्यासाठी या संस्थांची पथके स्वतः तिकडे जाऊन कारवाई पूर्ण करणार आहे.
डिफेन्स लीडर संजय भंडारी, हिरेव्यापारी नीरव मोदी आणि किंगफिशर एअरलाइन्सचे प्रवर्तक विजय माल्या यांच्यासहित भारताचे मोस्ट वाँटेड फरार आरोपी गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये आहेत.
आता त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगात करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचलनालय (ईडी), राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांचे उच्चस्तरीय पथक लवकरच ब्रिटनसाठी रवाना होणार आहे. ‘गुन्ह्यांतून मिळवलेली कमाई’ जप्त करण्यासाठी ब्रिटन आणि अन्य देशांत त्यांच्या असलेल्या मालमत्तांची पडताळणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पथकाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे एक वरिष्ठ अधिकारी करत आहेत. तसेच, लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या बैठका ठरवण्यात आल्या आहेत. या बैठकांत लंडनमध्ये फरार आरोपींनी मिळवलेल्या संपत्तीची माहिती आणि त्यांच्या बँकिंग व्यवहाराची माहिती मागण्यात आली आहे.
हे ही वाचा:
देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…
अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!
पतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे ‘कुंकू पुसले’
एनआयएचे पथक सध्या खलिस्तानी आंदोलनाशी संबंधित अनेक दहशतवादी संघटनांची चौकशी करत आहे. तर, नीरव मोदी पीएनबीच्या साडेसहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार आहे. दुसरीकडे, बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी विजय माल्या याची पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याचवेळी संरक्षण व्यवहारांप्रकरणी कथितपणे मिळालेल्या रकमेसाठी भंडारी, थम्पी आणि वाड्रा यांची चौकशी सुरू आहे. तपास संस्थांनी याआधीच भंडारी याची भारतातील २६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने भंडारीलाही माल्या आणि नीरव मोदीसारखे आर्थिक गुन्हेगार जाहीर केले आहे.