परळ आणि प्रभादेवीला जोडणारा महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. त्याऐवजी नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल तसेच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाण पुलाचे बांधकाम होणार आहे. हे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरण करणार आहे, ज्यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ बंद राहणार आहे. परिणामी, राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
लवकरच एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे होणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार असून, या बदलामुळे रा.प. परळ आगारातून दादर येथे जाणाऱ्या साध्या, सेमी व शिवशाही बससेवांचा मार्ग बदलण्यात आला आहे. नव्या मार्गामुळे दादर-परळ बसप्रवासात वाढ झाल्याने तिकिटांच्या एका टप्प्याचा दर वाढणार आहे.
पर्यायी मार्ग दादरकडून परळला जाताना टिळक ब्रिज–कबुतरखाना–भवानी शंकर रोड–शारदाश्रम मार्गे बस धावेल. तर परळ ते दादर परतताना बाबुराव परुळेकर मार्गावरून भवानीशंकर मार्गे कबुतरखाना–दादर टीटीमार्गे दादर स्थानकात बस पोहोचेल. या बदलामुळे तिकिट दरात त्याचा परिणाम दिसून येणार आहे.
हेही वाचा :
दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी; मेलमध्ये द्रमुकचा उल्लेख
नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेल पेटवल्याने भारतीय महिलेचा मृत्यू
मॉरिशसच्या पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ मंदिराला दिली भेट; रामलल्लाचेही घेणार दर्शन
राहुल गांधी स्वतःला संविधानापेक्षा वरचढ समजतात!
नवीन मार्गामुळे किलोमीटर वाढले
- साध्या आणि शिवशाही बससाठी: परळ आगारातून दादरला ये-जा करणाऱ्या साध्या, सेमी आणि शिवशाही बसेसना आता लांबच्या मार्गाने जावे लागेल. या नवीन मार्गामुळे दादर ते परळ अंतर ६.२ किमी आणि परळ ते दादर अंतर ६.० किमी होणार आहे. यामुळे प्रवासाच्या अंतरात वाढ होऊन तिकीट दरातही वाढ होईल.
- ई-शिवनेरी आणि शिवनेरी बससाठी: या बससाठीही मार्ग बदलण्यात आला आहे. यामुळे दादर ते परळच्या मार्गात ०.४ किमी आणि परळ ते दादरच्या मार्गात ०.९ किमी वाढ होणार आहे. त्यामुळे, ई-शिवनेरीच्या तिकिटाची गणना करताना वाढीव अंतर विचारात घेतले जाईल.
हा बदल पुलावरील वाहतूक बंद झाल्यावर लगेचच लागू केला जाईल. यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो.







