कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी केंद्र सरकारवर कन्नडकडे दुर्लक्ष करून हिंदी लादल्याचा आरोप केला आणि राज्यातील लोकांना “कन्नड विरोधी” असलेल्यांना विरोध करण्याचे आवाहन केले. त्रिभाषा धोरणावरून सुरू असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. बेंगळुरू येथे राज्योत्सव दिनाच्या समारंभात बोलताना, मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय तिजोरीत महत्त्वपूर्ण योगदान देऊनही कर्नाटकला संसाधनांचा योग्य वाटा मिळत नसल्याने संघराज्यीय रचनेचे नुकसान होत आहे.
“केंद्र सरकार कर्नाटकला सावत्र आईसारखे वागवत आहे,” असे सिद्धरामय्या म्हणाले. त्यांनी आरोप केला की, “आम्ही केंद्राला ४.५ लाख कोटी रुपयांचा महसूल देतो, परंतु त्या बदल्यात आम्हाला केवळ तुटपुंजी रक्कम मिळते. कन्नड भाषेवर अन्याय होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, “हिंदी लादण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. हिंदी आणि संस्कृतच्या विकासासाठी अनुदान दिले जाते तर देशातील इतर भाषांकडे दुर्लक्ष केले जात आहे.”
“कन्नड भाषेच्या विकासासाठी पुरेसा निधी नाकारून तिच्यावर अन्याय केला जात आहे. कन्नड विरोधी असलेल्या सर्वांचा आपल्याला विरोध करावा लागेल,” असे सिद्धरामय्या म्हणाले. कन्नड भाषा आणि तिची संस्कृती नवीन उंचीवर नेण्याची गरज अधोरेखित करताना, मुख्यमंत्री म्हणाले की शिक्षणात कन्नड भाषेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.







