गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप असलेला संशयित वाल्मिक karad हा आज पुण्यातील पाषाणरोड येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला आहे. शरण होण्यापूर्वी कराड याने एक व्हिडीओ जारी केला असून त्याने आपण शरण जात आहोत आणि जर यामध्ये मी दोषी असेल तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला आपण तयार आहोत असे सांगितले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्या या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी केला होता. त्याला अटक करावी यासाठी काही दिवसापूर्वी बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता. वाल्मिक कराड याचा संबंध हा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला गेल्याने या विषयाची चर्चा जोरदार सुरु होती. मंत्री मुंडे यांनी आपला तो सहकारी असल्याचे जाहीर सांगितले होते.
हेही वाचा..
भ्रष्टाचार के तीस मार खान; दिल्लीत भाजपाकडून आपविरोधात बॅनरबाजी
येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सापडले ४४ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर!
… म्हणून प्रियांका वाड्रा यांनी गृहमंत्री शाहांचे मानले आभार
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे. यापूर्व वाल्मिक कराड याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत तसेच फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
वाल्मिक कराड हा तीन आठवड्यापासून फरार होता. त्याचा शोधही घेण्यात येत होता. २१ दिवसानंतर आज तो सीआयडीला शरण गेला आहे. या हत्येप्रकरणात कराड हाच याचा सूत्रधार आहे, असा आरोप करण्यात आला आहे. शरण जाण्यापूर्वी कराडने जो व्हिडीओ केला आहे त्यात त्याने केज पोलीस ठाण्यात जो त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो गुन्हा सुद्धा राजकीय आकसापोटी दाखल करण्यात आला आहे. हे राजकीय षड्यंत्र असल्याचे त्याने म्हटले आहे.