उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मान गावात शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी हिमस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल ५५ कामगार बर्फाखाली अडकले होते. दरम्यान या घटनेतील मृतांची संख्या चार झाली आहे. डेहराडून येथील संरक्षण जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) यांच्या मते, हिमस्खलनाच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराचा शोध अद्याप घेतला जात आहे. तर ५० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
सेंट्रल कमांडमधील जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी-इन-सी) लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी मान हिमस्खलन घटनेची माहिती दिली आणि सांगितले की, हवामान आणि रस्त्याची परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर युएव्ही आणि रडारसह सर्व मदत पुरवली जाईल. जखमींना बाहेर काढण्यासाठी हवाई प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला आशा आहे की सर्व एजन्सींशी समन्वय साधून आम्ही संध्याकाळपर्यंत ऑपरेशन पूर्ण करू.
माहितीनुसार, घटना घडल्यापासून बचावकार्य सुरू झाले होते. कालपर्यंत ३३ कामगारांना वाचवण्यात आले. त्यानंतर शनिवारी आणखी १७ जणांना वाचवण्यात आले हे. एकूण ५० जणांना वाचवण्यात आले आहे आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण अजूनही बेपत्ता आहे.
भारतीय सैन्याने सांगितले की शुक्रवारी सकाळी झालेल्या हिमस्खलनानंतर सीमा रस्ते संघटनेचे ५५ कामगार बर्फाखाली अडकले होते. हिमस्खलन बीआरओ कॅम्पवर आदळले, ज्यामुळे कामगार आठ कंटेनर आणि एका शेडमध्ये गाडले गेले. पाऊस आणि बर्फवृष्टीसह प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे शुक्रवारी संध्याकाळी बचावकार्य थांबवण्यात आले आणि हवामान सुधारल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. बचावकार्यात सामील होण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी सकाळी हिमस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण देखील केले. सततच्या बर्फवृष्टीमुळे या प्रदेशातील पाचहून अधिक ब्लॉकमध्ये वीज किंवा इंटरनेट नाही. शक्य तितक्या लवकर परिसरात संपर्क पुनर्संचयित करू. २०० हून अधिक कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली होती. शोध आणि बचाव कार्यात आवश्यक संसाधनांची कमतरता भासू नये असे निर्देश त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले आणि केंद्र सरकार देखील आवश्यक ती सर्व मदत करत असल्याचे सांगितले.
हे ही वाचा :
८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश
हिजबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त
संतोष देशमुख प्रकरण: वाल्मिक कराडंच मुख्य सूत्रधार, खंडणीसाठी केली हत्या
त्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक
जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती देताना सांगितले की, मान खिंडीजवळ हिमस्खलन झाले. ५७ बीआरओ कामगार कंटेनरमध्ये राहत होते, त्यापैकी दोन कामगार रजेवर होते. ५५ कामगारांपैकी आतापर्यंत ५० लोकांना वाचवले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ४ हेलिकॉप्टर पाठवले आहेत. त्यांच्या मदतीने आतापर्यंत २५ कामगारांना ज्योतिर्मठ येथे आणण्यात आले आहे. आयटीबीपी आणि लष्कराने केलेल्या बचाव कार्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्यांनी सांगितले की, २८ सदस्यांची एनडीआरएफ टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे.