ओलंपिक सुवर्णपदक विजेता आणि दोन वेळचा पदकप्राप्त भालाफेकपटू नीरज चोप्रा याने त्याच्याच नावाने सुरू झालेल्या ‘नीरज चोप्रा क्लासिक २०२५’ स्पर्धेचा पहिला हंगाम जिंकून आपल्या चाहत्यांना आनंदाचा क्षण दिला. या जागतिक दर्जाच्या भालाफेक स्पर्धेत त्याने ११ खेळाडूंना मागे टाकत ८६.१८ मीटर लांब फेक करून प्रथम क्रमांक पटकावला.
बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या या वर्ल्ड अॅथलेटिक्स गोल्ड लेव्हल स्पर्धा प्रकारात केनियाचा ज्युलियस येगो (८४.५१ मीटर) दुसऱ्या स्थानी राहिला, तर श्रीलंकेचा रुमेश पथिरगे (८४.३४ मीटर) तिसऱ्या स्थानी राहिला.
नीरजने पहिला थ्रो फाऊल केला, पण दुसऱ्या प्रयत्नात ८२.९९ मीटर थ्रो करत आघाडी घेतली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८६.१६ मीटर थ्रो करून दिवसातील सर्वोत्तम फेक केली. चौथा थ्रो फाऊल गेला, तर पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात अनुक्रमे ८४.०७ आणि ८२.२२ मीटरची कामगिरी केली.
नीरज म्हणाला,
“हवामानाची परिस्थिती अनुकूल नव्हती, त्यामुळे थोडं आव्हान होतं. पण ही स्पर्धा माझ्यासाठी खूप खास होती. मी स्वतःच्या नावाने सुरू केलेल्या स्पर्धेचा पहिला विजेता झालो याचा आनंद आहे. माझं कुटुंब इथे होतं, त्यामुळे हा क्षण अजूनच भावुक होता.”
ही स्पर्धा नीरज चोप्रा आणि JSW Sports यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. भारतीय अॅथलेटिक्स महासंघ (AFI) आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स यांची अधिकृत मान्यता लाभलेली ही भारतातील पहिली जागतिक स्तरावरील भालाफेक स्पर्धा ठरली.
या स्पर्धेत एकूण १२ आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतला होता.
