31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरविशेषहामीद अन्सारी यांची खदखद, कंड आणि नैराश्य

हामीद अन्सारी यांची खदखद, कंड आणि नैराश्य

Google News Follow

Related

यूपीएच्या कार्यकाळात देशात सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदू समाजाचा द्वेष करणारे टोळके सत्ता राबवित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे नेतृत्व करीत होत्या. यूपीएच्या २००४ ते २०१४ या काळात हिंदुंना अपमानित करण्याचा, बदनाम करण्याचा खेळ सातत्याने सुरू होता. माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी हे त्या खेळातील एक महत्वाचे मोहरे होते. ‘बाय मेनी ए हॅपी एक्सिडेंट’ हे त्यांचे ताजे आत्मचरीत्र. या पुस्तकाच्या निमित्ताने झी न्यूज या चॅनलवर त्यांची मुलाखत झाली. पुस्तकात केलेल्या खोडसाळ आणि द्वेष पूर्ण आक्षेपांवरून पत्रकार अमन चोप्रा यांनी त्यांचे जे काही वस्त्रहरण केले त्याला तोड नाही.

देशाच्या उपराष्ट्रपती पदावर दहा वर्षे विराजमान असलेल्या हामीद अन्सारींचा हिंदू द्वेष त्यांनी कधी लपवला नाही. दिल्लीतील रामलीला उत्सवात आरती आणि तिलक नाकारून त्यांनी हिंदू धर्मियांच्या भावनांना फारशी किंमत देत नसल्याचे दाखवून दिले. यूपीएच्या कार्यकाळात या द्वेषाला प्रचंड किंमत होती. हा द्वेष सत्तेच्या पायरीकडे नेणारा राजमार्ग होता. ‘देशाच्या संसाधनांवर पहीला अधिकार अल्पसंख्यकांचा आहे’, असे विधान करून तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी देशात हिंदू दुय्यम दर्जाचे नागरीक असल्याचे स्पष्ट केले होते.

हिंदू दहशतवादाचा अस्तित्वात नसलेला मुद्दा उकरून करून दिग्विजय सिंह बहुसंख्यकांना अपमानित करीत होते, त्या काळात हामीद अन्सारींना त्यांचा हिंदू द्वेष लपवण्याची गरजही नव्हती.

यूपीएच्या हिंदूद्वेषाचे उदाहरण दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘कोएलिशन इयर्स’ या पुस्तकात त्याचा दाखलाच दिला आहे. नोव्हेंबर २००४ मध्ये ऐन दिवाळीच्या काळात पुरीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना खूनाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यावर आक्षेप घेणारा एकमेव नेता यूपीएमध्ये होता तो म्हणजे प्रणब मुखर्जी. “एखाद्या मुस्लीम मौलवीला सरकारने ईदच्या काळात अशाप्रकारे अटक केली असती काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांचा मुद्दा पंतप्रधानांचे विशेष सल्लागार एम.के.नारायणन यांना पटला आणि शंकराचार्यांची जामीनावर सुटका झाली. यूपीएचा कार्यकाळ अशा हिंदूविरोधी घटनाक्रमाने भरलेला आहे. त्या काळात हामीद अन्सारी यांच्यासारख्या हिंदू द्वेष्ट्यांची चलती होती.

परंतु त्यांच्या दुर्दैवाने आणि देशाच्या सुदैवाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यूपीएचा बाजार उठला आणि हिंदुत्वाचा रास्त अभिमान बाळगणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा खमका पंतप्रधान देशाला मिळाला. मोदींच्या कार्यकाळात अडीच वर्षे अन्सारी उपराष्ट्रपती पदावर होते. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांना पायउतार व्हावे लागले. पुन्हा २०१९ मध्ये मोदींना पंतप्रधान पदी पाहणे त्यांच्या नशीबी आले.

उपराष्ट्रपती पदावर असताना राज्यसभेचे सभापती म्हणून सत्ताधारी रालोआची विधेयके रोखण्याचे धंदे त्यांनी केले. त्यासाठी नियम धाब्यावर बसवताना आपण काही चूकीचे करतोय असे त्यांना कधी वाटले नाही. क्षमता नसताना देशाच्या इतक्या महत्वाच्या पदावर बसवणा-या काँग्रेसचे पांग फेडण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. ते काँग्रेसच्या मोह-यासारखे वागले.

मोदींच्या काळातही त्यांनी जमेल तेवढा हिंदू द्वेष दाखवला. योग दिनात ते कधी सहभागी झाले नाहीत. प्रजासत्ताक दिनाला तिरंगा फडकवल्यानंतर सलामी न देऊन त्यांनी आपल्या कोत्या मनाचा परीचय जगाला दिला. वेळ पडल्यास ते देशाशी गद्दारी करू शकतात याची ही झलक होती.

२०१७ मध्ये अन्सारी पदावरून पायउतार झाल्यानंतर R&AW रिसर्च एण्ड ॲनालिसिस विंगच्या अधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून अन्सारींच्या देशविरोधी कृत्याचा पाढा वाचला होता. १९९०-९२ या काळात तेहरानमध्ये भारतीय दूतावासात कार्यरत असताना त्यांनी R&AW च्या कामात केवळ अडथळे आणले नाहीत तर इराणी गुप्तचर संस्था SAVAK सोबत हातमिळवणी करून देशहिताला बाधा येईल अशा कारवाया केल्या होत्या. रॉचे निवृत्त अधिकारी एन.के.सूद यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला होता.

उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर अन्सारी केरळमध्ये पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडीया या संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पीएफआय ही संघटना एनआयएच्या रडारवर आहे. इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्याचे काम पीएफआय करते असे भक्कम पुरावे एनआय़एकडे आहेत. अन्सारी यांनी पीएफआयच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल भाजपाने त्यांच्यावर कठोर टीका केली होती.

विकृतीच्या टोकापर्यंत सहिष्णू असलेल्या भारतासारख्या देशात लोकांनी हे सहन केले. एखाद्या अरब राष्ट्रामध्ये असा प्रकार करणा-याला लाथा घालून यांना हाकलवण्यात आले असते.

पदावर असताना आणि पद गेल्या नंतरही राष्ट्रपती प्रणब मुखर्जी जसा आब राखून होते ते अन्सारींना कधीच जमले नाही. दहा वर्षे देशाचे उपराष्ट्रपती राहूनही अन्सारींनी देशातील मुस्लीम अस्वस्थ आहेत असे तद्दन संकूचित आणि खोटारडे विधान केले.

ज्यांच्या जीवावर अन्सारी उपराष्ट्रपती झाले त्या यूपीएचा कडेलोट होऊन आता सहा वर्षे लोटली आहे. अन्सारी आता निवृत्त जीवन जगताय. पद आणि प्रतिष्ठा संपली असली तरी मोदी द्वेषाची खदखद मात्र कायम आहे. आत्मचरीत्रात त्यांनी खदखद व्यक्त करून घेतली आहे. देशात हिंदूविरोधाचे राजकारण आचके देत आहे. देश मोदींच्या मागे भक्कमपणे उभा आहे. अन्सारींसारख्या मोदी द्वेष्ट्यांना मोदींच्या विरोधात बोटे मोडत राहण्या पलिकडे महत्व उरलेले नाही. अन्सारींच्या ताज्या पुस्तकाचा मतितार्थ फक्त एवढाच आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा