27.9 C
Mumbai
Sunday, July 26, 2026
घरसंपादकीयएका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर...

एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर…

Google News Follow

Related

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘जंतर मंतर’वर उपोषण करणारे सोनम वांगचूक यांनी काल भाजप नेते तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रताप नड्डा यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आंदोलन मागे घेतले. अभिजीत दिपके याने मात्र आंदोलन जारी ठेवले. आज त्याने देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. हे दोघेही ‘जंतर मंतर’च्या उपोषण मंचावर एकत्र होते; मात्र आता त्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. आपला ‘अण्णा हजारे’ होईल अशी भीती वांगचूक यांना होती काय? याची शक्यता दाट आहे.

रातोरात वेगाने घडामोडी घडल्या. गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ११:५२ वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर पुढच्या तासाभरात उपोषणनाट्य संपले.

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी हे उपोषण मागे घेतले आहे, पहाटे १:२१ वाजता त्यांनी ‘एक्स’वर (X) ही पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ मेसेज अपलोड केल्यानंतर ठीक १ तास २९ मिनिटांनी हे घडले. देशात हिंसाचार पसरेल ही शक्यता लक्षात घेऊन वांगचूक यांनी उपोषण मागे घेतले, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची रात्री बैठक घेतली. इथून घडामोडींना सुरुवात झाली. दोन्ही भाजप नेते गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये वांगचूक यांची भेट घ्यायला रवाना झाले. वांगचूक यांच्या तीन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. विद्यमान परीक्षा पद्धतीबाबत संसदेत चर्चा केली जाईल, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याचा विचार केला जाईल, आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत.

शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, ही त्यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आंदोलनात तलवारी, खुकरी नाचवणारे, पोलिसांना मारहाण करणारे, त्यांच्यावर पेपर स्प्रेचा मारा करणारे, महिला पत्रकाराच्या अंगचटीला जाणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारे आणि त्यांचे तेरावे घालणारे आदी मंडळींवर कारवाई करायला सरकार मोकळे आहे.

हे ही वाचा:

चांदीच्या आयातीवर निर्बंधांचा परिणाम

फ्लिपकार्टची फूड डिलिव्हरी क्षेत्रात दमदार एन्ट्री

भारतीय पासपोर्टची जागतिक क्रमवारीत पुन्हा घसरण

कॉक्रोच जनता पार्टी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम

वांगचूक यांना हिंसाचाराची शक्यता वाटते आहे. कदाचित दिपके टोळीचा मनसुबा त्यांच्या एक तर लक्षात तरी आला आहे किंवा त्याचे पुरावे त्यांच्या समोर ठेवण्यात आले आहेत. वांगचूक यांच्या माघारनाट्यामागे बरेच काही दडलेले आहे.

इथे बऱ्याच काळापासून नेपाळ आणि बांगलादेशची पुनरावृत्ती करण्याची तयारी सुरू आहे. असे घडले तर त्याला वांगचूक यांची हरकत नसावी, त्यांची मानसिकताही यापेक्षा वेगळी नाही. परंतु आंदोलनात हिंसाचार झाला तर त्याचे खापर आपल्यावर फुटणार नाही, याची काळजी वांगचूक यांनी घेतली आहे. वांगचूक यांची माघार ही एक खेळीही असू शकते. सरकारने आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे; कारण वांगचूक हे काही अण्णा हजारे नाहीत. चीन, पाकिस्तान, अमेरिका या सगळ्या देशांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एकदा लडाख पेटवून त्यांनी त्यांच्या क्षमतेचा परिचय दिला आहे.

पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून वांगचूक यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपोषणाची जबाबदारी अभिजीत दिपकेच्या अंगावर आली. हे त्याला झेपणारे नाही. ‘अंगात ताप असल्यामुळे मला आराम करण्याची आवश्यकता आहे’, असे कारण सांगून त्याने ‘जंतर मंतर’ सोडले आणि पुन्हा एसी रूममध्ये जमा झाला. ही नाजूक मंडळी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून १८ तास काम करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागतायत! सुपाऱ्या घेऊन आंदोलनाचा तमाशा उभा करणे वेगळे आणि देशासाठी काम करणे वेगळे.

अमेरिकेतून जंतर मंतरवर आल्यानंतर पहिल्या दिवसापासून दिपकेने त्याच्या नाजूक तब्येतीचा परिचय दिला आहे. पहिल्या दिवशी त्याला ऊनसुद्धा सोसवले नाही. वांगचूक यांचे उपोषण सुरू असताना दिपके टोळी कचोरी, समोसा, बर्गर, बिर्याणी खाऊन त्यांना साथ देत होती. आंदोलन सुरू झाल्यानंतर कॉक्रोच प्रवक्ता विजय दाहिया मस्तपैकी बर्गर ओरपत होता. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गवगवा झाल्यानंतर दिपकेने त्याला हाकलले. त्यानंतर चिडलेल्या दाहियाने, “दिपकेसुद्धा वांगचूक यांचे उपोषण सुरू असताना कचोऱ्या हादडतच होता,” अशी टीका करून हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात, फार लवकर ‘कॉक्रोच जनता पार्टी’त एकमेकांना पायाखाली चिरडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

वांगचूक यांना पोलिसांनी जेव्हा उपोषणस्थळावरून उचलले, तेव्हासुद्धा दिपके एसी रूममध्ये मस्तपैकी आराम करत होता. वांगचूक यांना हे शंभर टक्के खटकले असेल. तेव्हाच त्यांना वास आला असेल की, आपला ‘अण्णा हजारे’ करण्याची तयारी सुरू आहे.

अण्णा लोकपाल विधेयकासाठी लढत होते; तर अरविंद केजरीवाल दिल्लीवर नजर रोखून बसले होते. पोराबाळांच्या शपथा खात होते—‘मी राजकारणात कधीही जाणार नाही, सरकारी बंगला घेणार नाही, सरकारी गाडी कधी वापरणार नाही’. अण्णा हजारे यांच्याबाबत शंभर आक्षेप घेता येतील; परंतु त्यांचा लढा जनहितासाठी होता, त्यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता याबाबत कोणाचेही दुमत नाही. हेतू साध्य झाल्यानंतर टिश्यू पेपरसारखे अण्णांना फेकून देण्यात आले. मुलाबाळांच्या डोक्यावर हात ठेवून घेतलेल्या सगळ्या शपथा यमुनेत विसर्जित करून केजरीवाल राजकारणातही आले, मुख्यमंत्रीही झाले आणि जनतेच्या पैशावर त्यांनी ‘शीशमहल’सारखे शौक पूर्ण करून घेतले. आपला ‘टिश्यू पेपर’ होऊ नये, याची वांगचूक काळजी घेत आहेत.

२० जुलैपासून हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनात उडी घेतली. जंतर मंतरवर आंदोलन न करता त्यांनी थेट पंतप्रधान निवासावर आंदोलन सुरू केले. त्यावर वांगचूक यांची पत्नी गीतांजली यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकण्यासारखी आहे: ‘राहुल गांधींचे आंदोलन प्रामाणिक नव्हते. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन न करता जंतर मंतरवर आंदोलन करायला हवे होते.’ जंतर मंतरवर राहुल गांधी यांनी आंदोलन केले असते, तर मीडियाचा प्रकाशझोत दिपकेसोबत विभागला गेला असता; हे त्यांना नको होते.

ही सगळी मंडळी मोदींच्या विरोधात एक असली, तरी आपापसात त्यांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नाही. किंबहुना यांच्यात अंतर्गत चुरस मोठी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक व्हिडिओ जारी केला. पेपरफुटीबाबत चिंता व्यक्त करणारा आणि कठोर कारवाईचे आश्वासन देणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इन्स्टावर याला २०३ दशलक्ष, युट्यूबवर ११ लाख, आणि ‘एक्स’वर २६.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जो संताप होता, त्यावर फुंकर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

वांगचूक बाजूला झाल्यामुळे तूर्तास कॉक्रोच आंदोलनातील हवा निघाली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका अभिजीत दिपके याने जाहीर केली असली तरी ती मान्य होण्याची शक्यता नाही. राहुल गांधी यांनी आणखी दोन मागण्या जोडल्या आहेत—पंतप्रधानांची माफी आणि विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई. यापैकी एकही मागणी मान्य होणार नाही हे ठाऊक असल्यामुळेच त्यांनी बहुधा या मागण्या रेटल्या आहेत.

दिपकेला हे आंदोलन फार काळ चालवता येणार नाही; कारण त्याला उन्हाचा त्रास होतो, तो उपाशी राहू शकत नाही आणि त्याला एसी रूममध्ये राहण्याची सवय आहे. मोदींना शिव्या घालण्याच्या पलीकडे त्याला काहीच येत नाही. कॉक्रोचच्या समर्थकांना हे लक्षात आले आहे. ‘आम्ही इथे लाठ्या खात असताना अभिजीत आणि सौरव दास एसीमध्ये का बसले होते?’ असा सवाल आता आंदोलक विचारत आहेत.

‘सीजेपी’चा प्रवक्ता सौरव दासला आंदोलकांनी झापले—‘आम्ही इथे लाठ्या खातोय आणि तू आम्हाला ज्ञान द्यायला आलायस?’ असा सवाल विचारून त्याला माफी मागायला सांगितली. युवकांच्या आंदोलनाचे नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी त्याग करण्याची आणि त्रास सोसण्याची तयारी हवी, हे आता दिपकेच्या लक्षात आले असेल. विद्यार्थ्यांच्या संतापाच्या लाटेवर तो स्वार होऊ पाहत होता; पण ही स्वारी वाघावर स्वारी करण्यासारखी आहे. दिपकेला हे झेपणारे नाही. त्याच्या फुग्याला वांगचूक यांनीच टाचणी लावली आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा