मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे अंतरिम सरकार केवळ प्रशासनात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत नाही तर इतर गोष्टींमध्ये देखील बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील मध्यवर्ती बँकेने रविवार (१ जून) नव्या चलनी नोटा जारी केल्या आणि विशेष म्हणजे या नव्या नोटांमधून बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढण्यात आला. छापलेल्या नवीन नोटांमध्ये बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, नैसर्गिक दृश्ये पारंपारिक ठिकाणे आणि हिंदू-बौद्ध मंदिरांचे चित्र आहे. याच दरम्यान, नव्या नोटांचे छायाचित्रे समोर आली आहेत. या नव्या नोटावर हिंदूंचे ‘कांताजेव मंदिर’ छापण्यात आले आहे.
बांगलादेशच्या २० टकाच्या नोटेवर कांताजेव मंदिर आहे. या मंदिराला ‘कांतानगर मंदिर’ किंवा ‘कांताजी मंदिर’ असेही म्हटले जाते. १८ व्या शतकातील असलेले कांताजेव मंदिर बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर त्याच्या सुंदर ‘टेराकोटा’ वास्तुकलेसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये उत्तम कोरीवकाम केले गेले आहे, ज्याद्वारे हिंदू पौराणिक कथांमधील दृश्ये दाखवण्यात आली आहेत.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, २० टकाच्या नोटेच्या विरुद्ध बाजूला राजशाही विभागातील नौगाव जिल्ह्यात स्थित पहाडपूर बौद्ध मठ आहे. १९८५ मध्ये, या मठाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता आणि तो बांगलादेशातील अशा तीन स्थळांपैकी एक आहे. पहाडपूर बौद्ध विहार हा केवळ बांगलादेशातच नव्हे तर भारतीय उपखंडातही सर्वात प्रसिद्ध बौद्ध मठ आहे. पाल राजवंशाच्या कारकिर्दीत हा बौद्ध मठ बांधला गेला होता.
दरम्यान, १७०४ मध्ये दिनाजपूरचे राजा प्राणनाथ यांनी या मंदिराची पायाभरणी केली होती आणि हे नऊ मजली मंदिर ४८ वर्षांत पूर्ण झाले. तथापि, १७५२ मध्ये मंदिर पूर्ण होईपर्यंत प्राणनाथ यांचे निधन झाले होते. त्यानंतर, त्यांचा मुलगा राजा रामनाथ यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
हे ही वाचा :
‘RAW’-‘ISI’ एकत्र आल्यास भारत-पाकमध्ये दहशतवाद कमी दिसेल!
६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुस्लिम धर्मगुरूविरुद्ध पोक्सो खटला!
१० लाख सबस्क्राइबर्स, ज्योती मल्होत्राशी लिंक; हेरगिरी प्रकरणी आणखी एका युट्यूबरला अटक!
भारताविरोधात ISI चा नवा तळ म्हणजे बांगलादेश
कांताजेव मंदिर परिसरात दहशतवाद्यांचा हल्ला
२०१७ मध्ये ढाका ट्रिब्यूनमधील एका वृत्तानुसार, डिसेंबर २०१५ मध्ये भाविक ‘रास मेळा’ साजरा करत असताना न्यू जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) च्या दहशतवाद्यांनी कांताजेव मंदिरावर हल्ला केला होता. न्यू जेएमबी ही सीरियास्थित दहशतवादी संघटना, इस्लामिक स्टेट किंवा आयसिसची संलग्न संघटना आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्ये या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. मंदिर हल्ल्यानंतर लगेचच जेएमबीचे तीन दहशतवादी आणि २०१७ मध्ये आणखी दोन दहशतवादी पकडले गेले. मात्र, या दहशतवादी संघटनेने मंदिर हल्ल्याची कबुली दिली नाही.
