पंजाब पोलिसांनी बुधवारी (४ जून) आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंग असे अटक केलेल्या युट्यूबरचे नाव असून “जान महल” नावाचे त्याचे युट्यूब चॅनल आहे आणि त्यावर १० लाख सबस्क्राइबर्स आहेत. पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासात असे दिसून आले आहे की जसबीर सिंग हा पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) शाकीर उर्फ जट्ट रंधावाच्या संपर्कात होता, जो दहशतवादी संघटनांद्वारे समर्थित हेरगिरी नेटवर्कचा भाग आहे. याशिवाय, तो हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जसबीर सिंगला दानिशने दिल्लीतील पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात आमंत्रित केले होते. तेथे त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सशी संवाद साधल्याचा आरोप आहे. असेही म्हटले जात आहे की तो २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये तीनदा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये पाकिस्तानमधील अनेक संपर्क क्रमांक सापडले आहेत. या प्रकरणी अधिक तपास आणि त्याची चौकशी सुरू आहे. डीजीपीच्या मते, ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर लगेचच, जसबीर सिंगने नेटवर्कशी असलेल्या त्याच्या सर्व संपर्कांचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा :
भारताविरोधात ISI चा नवा तळ म्हणजे बांगलादेश
सीडीएस जे काही म्हणाले, ते आधीही सांगण्यात आले होते..
१८ वर्षांची प्रतीक्षा संपली… विराट कोहलीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! आरसीबी आयपीएल चॅम्पियन!
म्हणून राबविले जात आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर, मिशन फितूर…
दरम्यान, आतापर्यंत पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सात जणांना अटक केली आहे . फलकशेर मसीह आणि सूरज मसीह यांना अमृतसरमधील अजनाला येथून अटक करण्यात आली होती आणि मालेरकोटला येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय महिला गुजाला आणि यामीन मोहम्मद यांनाही गेल्या महिन्यात ताब्यात घेण्यात आले होते. आयएसआयला संवेदनशील लष्करी माहिती शेअर केल्याबद्दल गुरदासपूर येथून पोलिसांनी सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंगला अटक केली.
