पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानी हस्तकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर त्याची तीव्रता वाढवण्यात आली. पडघा, बोरीवली येथे एटीएसने सलग दोन दिवस केलेली कारवाई याच मोहीमेचा एक भाग आहे. घाऊकपणे सुरू असलेल्या या अटकसत्रामागे काही विशेष कारणे आहेत का? असा सवाल अनेकांच्या मनात आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे. पाकिस्तानच्या आयएसआयने भारतातील स्लीपर सेल सक्रीय करायला सुरूवात केलेली आहे. अनेक लोक सीमे पलिकडून येणाऱ्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांनी काही तरी केल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आधीच त्यांचे पेकाट मोडलेले बरे असा विचार करून ही कारवाई सुरू झालेली आहे. युक्रेनने रशियाला ऑपरेशन स्पायडर वेबद्वारे दिलेला दणका लक्षात घेता, भारतात फितुरांविरोधात राबवण्यात येणाऱ्या या कारवाईला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे.
फितुरांच्या विरोधात कारवाई का आवश्यक आहे हे लक्षात घ्या. फितुरांचा वापर कसाही होऊ शकतो. भारता पाक संघर्षा दरम्यान, पाकिस्तानची क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन भारताच्या सीमेवर रोखले गेले. परंतु युक्रेनने राबवलेल्या ऑपरेशन स्पायडर वेब प्रमाणे आधी भारतात हे ड्रोन पोहोचवायचे आणि नंतर महत्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करायचे अशी रणनीती आखली गेली तर काय?
भारतात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, भाभा अणुशक्ती, कित्येक ऑईल डेपो, झोपडपट्ट्यांनी वेढलेले आहेत. इथे ड्रोन आणि फितूर एकवटले की किती तरी मोठा घातपात होऊ शकतो. युक्रेनने देशांतर्गत तयार केलेली एफपीव्ही ड्रोन मालवाहू ट्रकने रशियाच्या आतपर्यंत नेली. ही ड्रोन लाकडी कंटेनरमध्ये लपवण्यात आली होती. हा ट्रक एका लाकडी शेडमध्ये उभा करण्यात आला. इरकुत्स्क येथील बेलाया हवाईतळासह अनेक तळांना ड्रोनचा मारा करून लक्ष्य करण्यात आले. अवघी १२०० डॉलर किंमत असलेल्या या ड्रोननी रशियाची ५० टेहळणी विमाने, टीय-५०, टीयू-२२ बॉम्बर आणि अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले टीयू-९५ या हल्ल्यात नष्ट झाले. एका दिवसात सुमारे ७ अब्ज डॉलरचा फटका रशियाला बसला.
युक्रेनच्या सीमेपासून रशियामध्ये ४००० किमी आतपर्यंत हा ट्रक गेला. रशियन सैन्याची नजर चुकवून हा ट्रक आत आला कसा, हे एक कोडेच आहे. ड्रोनचे एआय संचालित होते. त्यामुळे ते रशियाच्या सीमेच्या आत आणणे एवढाच विषय़ होता. स्लीपर सेलचा वापर करून पाकिस्तान हा प्रयोग भारतात करू शकतो. विषय सोपा आहे. त्यांना ड्रोन फक्त भारतात पाठवायची आहेत. यापूर्वी जसे आरडीएक्स आले तसेच. हे टाळायचे असेल तर भारतातील पाकिस्तानच्या हस्तकांना खणून काढायला हवे.
ड्रोन युद्धा युद्धात शत्रूने मार खाल्लेला आहे. तो जखमी आहे, परंतु संपलेला नाही. असा शत्रू अधिक धोकादायक असतो. पाकिस्तान भारतासाठी अधिक धोकादायक झालेला आहे. भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पुन्हा लष्करी साहस कऱण्याच्या भानगडीत पाकिस्तान पडणार नाही. भारतातील हस्तकांचा वा
पर करणे पाकिस्तानसाठी अधिक सोयीचे आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पाकिस्तानच्या या छदम् युद्धनीतीचे जाणकार आहेत. अटॅक इज द बेस्ट डीफेन्स, अर्थात आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे लक्षात घेऊन, पंचम स्तंभीयांचा बीमोड कऱण्याचा उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे.
पडघ्यात १ जूनच्या पहाटेपासून सलग दोन दिवस छापेमारी सुरू होती. एटीएसच्या २० पथकांसह ४०० पोलिस ३० महिला पोलिस या कारवाईत सहभागी झाले होते. तब्बल ४७ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. एका गावात कारवाईसाठी जाताना ४०० पोलिसांचा ताफा घेऊन जावा लागतो, कारण पडघ्याचा लौकीक तसाच आहे. यापूर्वी इथे कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला झालेला आहे. हा अनुभव लक्षात घेऊन या कारवाईची चोख तयारी करण्यात आली होती. कुख्यात दहशतवादी साकीब नाचणच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. एकूण १२ संशयितांना या कारवाईत अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यूट्यूब ब्लॉगर ज्योती मलहोत्रा हीच्या अटकेनंतर या मोहिमेला जोर आल्याचे दिसते आहे. हरीयाणातील या ट्रॅव्हल ब्लॉगरच्या अटकेनंतर तिचे संपर्ण जाळे सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केले. एकूणच गेल्या काही काळातील घटनाक्रमाकडे आपण नजर टाकली तर लक्षात येईल की देशभरात हे अटक सत्र सुरू आहे. पंजाब, हरीयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये ही छापेमारी करण्यात आली. दंगलीमुळे बदनाम झालेल्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, हरीयाणानी मेवात आणि नूह येथेही या पाकिस्तानी हस्तकांना पकडण्यात आले आहे.
हे ही वाचा:
कामगारांना मिळणार डिजिटल न्याय
ऐकण्याच्या क्षमतेतील घट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक
पाकिस्तान: १७ वर्षीय सना युसूफच्या हत्येचे कारण आले समोर!
आयसीइए कडून उद्योग-व्यापी उपक्रमाची सुरूवात
ठाण्यातील रवींद्र शर्मा नावाच्या एका इलेक्ट्रीशिअनने तर नौदलाच्या १४ जहाजांचे लोकेशनच पाकिस्तानला दिले होते. क्रास्नी डीफेन्स टेक्नोलॉजी या कंपनीत तो ज्युनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. या कंपनीकडे माझगाव डॉक, नावल डॉकयार्ड, इंडीयान कोस्ट गार्ड आदींच्या दुरुस्तीचे कंत्राट होते. वर्मा हा इलेक्ट्रीक विभागात कार्यरत होता. दुरुस्तीसाठी त्याला अनेकदा संवेदनशील आस्थापनांमध्ये प्रवेश मिळत असे. त्याला फेसबुकवर हनीट्रॅप करण्यात आले. त्यातूनच त्याने पाकिस्तानला नौदल जहाजांच्या तैनातीबाबत अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली.. त्याचा घसघशीत मोबदलाही त्याने कमावला. त्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम आली असून परदेशात खाते उघडून त्यांला पैसे पाठवण्यात आलेले आहेत. भारताच्या १४ वॉर शिपचे लोकेशन याने पाकिस्तानला दिले होते.
ऑपरेशन सिंदूर सुरू होण्याच्या आधी केंद्र सरकारने लष्कराच्या हालचालीबाबत कोणताही तपशील उघड करू नये अशा सुचनाच मीडियासाठी जारी केल्या होत्या. त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून ज्या खबरी पूर्वी पाकिस्तानकडे पोहोचायच्या त्या बंद झाल्या. त्यामुळे हस्तकांना सक्रीय करून पाकिस्तानने ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यातले बरेच जण हे जिहादी मानसिकतेचे होते, गज्वा ए हिंद अर्थात भारताचे इस्लामीकरण या तत्वज्ञानाने भारलेले आहेत. अनेक जण हनी आणि मनीसाठी काम करणारे गद्दार आहेत.
पाकिस्तानला ७ मे ते १० मे दरम्यान भारतीय सेनादलांनी दणके दिले. कारण भारताकडे पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांबाबत, त्यांच्या लष्करी हालचालींबाबत चोख माहिती होती. भारतातील सैन्य तळांना लक्ष्य करण्यासाठी तेवढी अचूक माहिती पाकिस्तानकडे नव्हती. ती मिळवण्यासाठी पाकिस्तानने हे हेरांचे जाळे सक्रीय केल्याचे प्राथमिक माहितीवरून तरी दिसते. होते. ऑपरेशन सिंदूर थांबलेले नाही, हा केवळ एक पॉज आहे. हे भारताने स्पष्ट केलेले आहे. पाकिस्तानलाही हे माहित आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने पाकिस्तानच्या पंजाबम, सिंधमध्ये मारा केला. असा खोलवर हल्ला करण्याची क्षमता असती तर त्यांनीही भारताला दणका दिला असता. आपल्या मारक क्षमतेसोबत आपला बचाव अभेद्य असल्यामुळे हे शक्य झाले नाही. परंतु स्पायडर वेब सारख्या युद्ध तंत्राचा भारताला भविष्यात फटका बसू शकतो. भारताने त्यासाठी सजग राहण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
