१८ वर्षांची काळजातली सल… एक अपूर्ण स्वप्न… अखेर आज पूर्ण झालं! विराट कोहलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, कारण आज त्याच्या आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी उचलली!
होय, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आता नवीन आयपीएल चॅम्पियन आहे! नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या थरारक अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सला अवघ्या ६ धावांनी हरवत ही ऐतिहासिक कामगिरी केली.
एक अखंड स्वप्न, अखंड निष्ठा… आणि अखेर तो दिवा पेटला!
ही केवळ विराट कोहली, रजत पाटीदार किंवा क्रुणाल पांड्याची विजयगाथा नाही…
ही त्या प्रत्येक आरसीबी फॅनची गोष्ट आहे, ज्याने पराभवाच्या दुसऱ्या दिवशीही लाल जर्सी घालून टीमवर विश्वास ठेवला!
आजचा दिवस त्या प्रत्येकासाठी आहे. एका सीएसके चाहत्याने म्हटलंय –
“शुक्रिया आरसीबी… तू सिद्ध केलं, हरता हरता जिंकणंही शक्य आहे!”
सामन्याचं चित्र :
टॉस जिंकून पंजाबने पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात ठिकठाक झाली आणि त्यांनी २० षटकांत ९ बाद १९० धावा केल्या.
एकही अर्धशतक नाही, पण प्रत्येक फलंदाजाने योगदान दिलं –
-
विराट कोहली – ३५ चेंडूत ४३ धावा
-
रजत पाटीदार – १६ चेंडूत २६
-
लिविंगस्टोन – १६ चेंडूत २५
-
मयंक अग्रवाल – १८ चेंडूत २४
-
शेफर्ड – ९ चेंडूत १७
शेवटच्या ५ षटकांत आरसीबीने ५८ धावा केल्या पण ५ विकेट्सही गमावल्या.
अर्शदीप सिंगच्या शेवटच्या षटकात तीन विकेट्स आणि केवळ ३ धावा – त्यामुळे २०० पार होणं थांबलं. पण आरसीबीने या स्कोअरचं रक्षण केलं… आणि कथेचा शेवट केला!
पंजाबचा पाठलाग – शशांकचा संघर्ष व्यर्थ!
पंजाबने ६ षटकांत ५२ धावा करत सुरुवात छान केली, पण नंतर विकेट्स कोसळत गेल्या.
शशांक सिंहने जबरदस्त खेळी करत ३० चेंडूत ६१ धावा ठोकल्या – त्यात ३ चौकार आणि ६ षटकार!
शेवटच्या षटकात हेजलवुडला ३ षटकार व १ चौकारही मारले. पण सामना थोडक्यात हुकला.
