पाकिस्तानची १७ वर्षीय टिकटॉक स्टार आणि युट्यूबर सना युसूफ हिच्यावर तिच्या घरात जवळून गोळ्या झाडण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सोशल मीडियावर लाखो लोकांच्या हृदयाचे ठोके असलेल्या सना युसूफच्या हत्येने केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण उपखंडातील तरुणांना धक्का बसला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. इस्लामाबाद पोलिसांचे आयजी सय्यद अली नासिर रिझवी म्हणाले की, सनाच्या मारेकऱ्याची ओळख पटली आहे. गुन्हेगार हा २२ वर्षांचा मुलगा आहे, ज्याला फैसलाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की हल्लेखोराने सनासमोर अनेक वेळा लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. प्रत्येक वेळी तिने नकार दिला. त्यानंतर ही घटना घडली. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजच्या (ARY News) बातमीनुसार, आरोपीचे नाव ‘काका’ आहे, ज्याला उमर म्हणूनही ओळखले जाते. उमर हा तिच्या ओळखीचा असून अनेक वेळा घरी आला होता.
घटनेच्या दिवशी तो सनाच्या घरात ‘पाहुणा’ म्हणून घुसला. त्याने सनावर अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आधी घराबाहेर सनाशी काही वेळ बोलला आणि नंतर घरात येऊन गोळीबार केला. सनाला अगदी जवळून दोन गोळ्या लागल्या, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा :
ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या अमानुष वागणुकीमुळे भारतीय व्यक्तीची प्रकृती गंभीर
नीती आयोगाने राज्यांशी संरचित सहभाग वाढवण्यासाठी केले कार्यशाळेचे आयोजन
तुर्कीच्या सेलेबी कंपनीचा मध्यस्थता अर्ज भारतात फेटाळला
देशहित काँग्रेससाठी महत्त्वाचं नाही
गृहमंत्री मोहसीन नक्वी म्हणाले की, पोलिसांनी आरोपीकडून हत्येत वापरलेले पिस्तूल आणि सनाचा मोबाईल फोन जप्त केला आहे. आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, आरोपी हा पंजाबचा आहे आणि सनाला तो आधीपासून ओळखत होता. प्राथमिक तपासात हत्येमागील कारण वैयक्तिक शत्रुत्व असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक करणे शक्य झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सनाचे टिकटॉकवर ७.२५ लाख फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर सुमारे ५ लाख फॉलोअर्स आहेत.
