दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरु केलेल्या दहशतवाद विरोधी मोहीमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीय, असे सडेतोड मत भारतीय खासदांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे खासदार श्रीकांत शिंदे हे एकमेव भारतीय खासदार ठरले आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, भारत मागील काही काळापासून दहशतवादी हल्ल्यांनी आणि सीमापार दहशतवादाने त्रस्त आहे. या छुप्या दहशतवादाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय खासदार येथे आलो आहोत. सर्व राष्ट्रांना दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतासोबत उभे राहण्याची विनंती करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिक पातळीवर दहशतवादविरोधी शून्य सहिष्णुता राबवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून आणि उपसभापती थॉमस पी. फल्लाह यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. सिनेटचे अध्यक्ष न्यूब्ली कारंगा लॉरेन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत श्रीकांत शिंदे म्हणाले, पाकिस्तानला बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) अर्थसहाय्य मिळत आहे. पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येही टाकण्यात आले होते.
मात्र सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये फोफावतात, त्यांना पाकिस्तानकडून पाठिंबा आणि प्रायोजित केले जाते. त्यामुळे यावेळीही भारताने पाकिस्तानचा ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा, अशी मागणी केल्याचे खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, लायबेरियाच्या कठिण काळात भारताने नेहमीच सोबत केली. दोन्ही देशांचे खास संबंध आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य बनणाऱ्या लायबेरियाकडून दहशतवादाविरोधात आवाज उठवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा :
पाकिस्तान: १७ वर्षीय सना युसूफच्या हत्येचे कारण आले समोर!
इज्ज अल-दिन अल-हद्दाद हमासची धुरा सांभाळणार!
कबुतरांना दाणा टाकण्याच्या प्रथेवर राष्ट्रीय हरित लवाद आक्रमक
कामगारांना मिळणार डिजिटल न्याय
खासदार श्रीकांत शिंदे आणि शिष्टमंडळाने लायबेरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष जोसेफ न्युमा बोकाई तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री साराह बेस्लो न्यान्ती यांच्याशी चर्चा केली. भारताच्या दहशतवाद विरोधी मोहीमाला लायबेरिया प्रजासत्ताकने भक्कम पाठिंबा दर्शवला असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून म्हणाले, दहशतवादाशी सामना करण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील चार देशांची एकजूट महत्वाची आहे.
सिनेट वरिष्ठ सभागृहाचे प्रो-टेम्पोर अध्यक्ष न्योनब्ली करंगा-लॉरेन्स यांच्या आदेशाने यावेळी लायबेरियाच्या संसदेत पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
