रशियन सैन्यासाठी लढणाऱ्या २२ वर्षीय भारतीय नागरिक माजोती साहिल मोहम्मद हुसेनला युक्रेनियन सैन्याने ताब्यात घेतले आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे. युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी माजोती साहिल मोहम्मद हुसेनने अवघ्या तीन दिवस युद्धभूमीवर राहिल्यानंतर ६३ व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडसमोर आत्मसमर्पण केले. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कीवमधील भारतीय दूतावास या वृत्तांची पडताळणी करत आहे. मात्र, युक्रेन सरकारकडून अद्याप कोणताही औपचारिक संदेश प्राप्त झालेला नाही, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.
युक्रेनियन लष्कराने त्यांच्या अधिकृत टेलिग्राम पोस्टमध्ये गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, माजोती साहिल मोहम्मद हुसेन हा सुरुवातीला शिक्षणासाठी रशियात गेला होता, मात्र तेथे त्याच्यावर ड्रग्जशी संबंधित आरोप लावण्यात आले. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आणि सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
“तुरुंगात जाण्यापेक्षा लढाईसाठी जाणे त्याने पसंत केले,” असे युक्रेनच्या ६३व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडने एका निवेदनात नमूद केले आहे. या संदर्भात ब्रिगेडने एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हुसेन रशियन भाषेत बोलताना दिसतो आणि स्वतः कबूल करतो की, तुरुंगवास टाळण्यासाठीच त्याने रशियन सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
“मला तुरुंगात राहायचे नव्हते, म्हणून मी ‘विशेष लष्करी कारवाई’साठी करार केला,” असे तो व्हिडिओ क्लिपमध्ये म्हणतो. ‘विशेष लष्करी कारवाई’ हा शब्द रशियाने युक्रेनवरील आक्रमणाचे वर्णन करण्यासाठी वापरलेला अधिकृत शब्द आहे. त्याचबरोबर तो पुढे म्हणतो, “पण मला तिथून बाहेर पडायचे होते.”
त्याच व्हिडिओमध्ये हुसेन सांगतो की, १ ऑक्टोबर रोजी आघाडीवर पाठवण्यापूर्वी त्याला फक्त १६ दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण मिळाले. त्याच्या कमांडरशी मतभेद झाल्यानंतर, त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. “मला सुमारे दोन किंवा तीन किलोमीटर अंतरावर युक्रेनियन खंदकांची (संरक्षणात्मक रचना) जागा आढळली. मी ताबडतोब माझी रायफल खाली ठेवली आणि म्हणालो की मला लढायचे नाही. मला मदत हवी आहे,” असे पीटीआयने उद्धृत केल्याप्रमाणे तो पुढे म्हणाला.
हे ही वाचा :
‘एके ६३०’ ने भारताच्या डिफेन्स सिस्टिमला मिळणार नवी शक्ती
पाक संरक्षण मंत्री बरळले, औरंगजेबाचा काळ सोडल्यास भारत कधीही एकसंध राष्ट्र नव्हता
समीर वानखेडे यांच्या मानहानी प्रकरणात न्यायालयाकडून नेटफ्लिक्सला समन्स जारी!
ओमानमध्ये वाईट अवस्थेत सापडलेल्या ३६ कामगारांसाठी धावून गेले पियुष गोयल







