भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध चालविलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाने इस्रायल खूप आनंदी आहे. त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करताना, इस्रायलने भारतासोबत संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारताने केला होता.
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल (आरईएस) अमीर बाराम यांनी गुरुवारी (१५ मे) भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला इस्रायलचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. याशिवाय, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचेही कौतुक करण्यात आले. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भविष्यातील पद्धतींवर चर्चा केली. यापूर्वी, भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी इस्रायलच्या पाठिंब्याची पुष्टी केली होती.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जगभरातून प्रतिक्रिया आल्या. अमेरिका, चीन आणि रशियासह जगभरातील देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही गुरुवारी सांगितले की, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा पाठिंबा मिळाला आहे.
हे ही वाचा :
इराकी जहाजाच्या क्रूमधील पाकिस्तानी नागरिकाला कारवार बंदरात प्रवेश नाकारला
“इंडी आघाडीचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही…” काँग्रेस नेते चिदंबरम असं का म्हणाले?
जयशंकर यांनी मानले तालिबानचे आभार!
पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले
याच दरम्यान, भारत-पाक युद्धात पाकला मदत करणाऱ्या तुर्कीविरुद्ध भारताने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस ) भारतीय विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. तुर्कीची ही ‘सेलेबी एव्हिएशन’ कंपनी भारतातील नऊ विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवत होती. यामध्ये मुंबई, दिल्ली, कोचीन, कन्नूर, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद आणि चेन्नई येथील विमानतळांचा समावेश आहे. यासह भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदासह इतर वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
