भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी बुधवारी (१६ एप्रिल) केंद्रीय कायदा मंत्रालयाला न्यायमूर्ती बीआर गवई यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानुसार न्यायमूर्ती बीआर गवई हे १४ मे २०२५ रोजी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. विशेष म्हणजे, २०१० मध्ये न्यायमूर्ती केजी बालकृष्णन यांच्या निवृत्तीनंतर ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे दुसरे अनुसूचित जातीचे न्यायाधीश असणार आहेत.
न्यायमूर्ती बीआर गवई हे पदभार स्वीकारल्यानंतर ६ महिन्यांसाठी सरन्यायाधीश असतील आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये निवृत्त होतील. न्यायमूर्ती बीआर गवई हे महाराष्ट्रातील अमरावती येथील आहेत. बीआर गवई हे दिवंगत आर.एस. गवई यांचे पुत्र आहेत, जे एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल होते.
१९८५ मध्ये त्यांनी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि नंतर महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बॅरिस्टर राजा भोसले यांच्यासोबत काम करत होते. बीआर गवई यांनी १९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली आहे.
हे ही वाचा :
दर्गा तोडल्यानंतर झालेल्या दगडफेकीत २१ पोलिसांचे हातपाय मोडले
नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला कायद्याचा सामना करावा लागेल
भारताचा डी2सी जागतिक स्तरावर फंडिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
ममता बॅनर्जींना दंगलपीडितांची झाली आठवण, १० लाख भरपाई देणार
बीआर गवई यांची १९९२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महाराष्ट्र सरकारचे सहाय्यक वकील आणि सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती गवई यांनी १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आपल्या न्यायालयीन कारकिर्दीला सुरुवात केली आणि १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांचे अध्यक्षपद भूषवले आहे. न्यायमूर्ती गवई २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आले आणि आता ते सरन्यायाधीश होणार आहेत.