ऋषभ शेट्टीचा “कांतारा: चॅप्टर 1” हा चित्रपट सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. प्रेक्षकांच्या अफाट प्रतिसादामुळे या चित्रपटाने फक्त तीन दिवसांतच १६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून, तो या वर्षातील सर्वाधिक यशस्वी भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे. विकेंड संपण्याआधीच त्याने अनेक मोठ्या हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. विशेष म्हणजे रविवारच्या दिवशी आणखी ५९ कोटींची कमाई करत पहिल्या चार दिवसांत २०० कोटींचा धंदा केला आहे.
दिवसानुसार कमाईचा आकडा
‘कांतारा: चॅप्टर 1’ ने भारतात पहिल्याच दिवशी (दसरा) दमदार सुरुवात केली. पहिल्या दिवशी ६१.८५ कोटी (दसरा ओपनिंग), दुसरा दिवस ४६ कोटी तर तिसऱ्या दिवशी ५५ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. त्यामुळे तीन दिवसांचा एकूण भारतातील नेट कलेक्शन १६२.८५ कोटींवर पोहोचला आहे.
कन्नड चित्रपटसृष्टीतील नवा इतिहास
शुक्रवारी या चित्रपटाने वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटाचा किताब पटकावला. त्याने “सु फ्रॉम सो” या चित्रपटाच्या ९२ कोटींच्या लाइफटाईम कमाईलाही मागे टाकले. शनिवारी ‘कांतारा: चॅप्टर 1’ ने सलमान खानचा “सिकंदर” (११० कोटी) आणि रामचरणचा “गेम चेंजर” (१३१ कोटी) या दोन्ही चित्रपटांच्या लाइफटाईम कमाईवर मात केली. तसेच, हा १५० कोटींचा टप्पा ओलांडणारा *फक्त चौथा कन्नड चित्रपट* ठरला आहे.
हे ही वाचा:
महिला वर्ल्डकप क्रिकेट सामन्यातही भारत-पाक कर्णधारांनी हस्तांदोलन नाही
भूतानने भारतीय सैन्याचे मानले आभार, पूरपरिस्थितीत तत्काळ मदत!
भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचे १२ वाजवले
बिहार निवडणुकीपूर्वी ‘बुरख्या’वरून वाद!
आंतरराष्ट्रीय पातळीवरही धमाल
परदेशातही या चित्रपटाचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन दिवसांतच ‘कांतारा: चॅप्टर 1’ ने $२५ लाख (सुमारे २२ कोटी रुपये) इतकी आंतरराष्ट्रीय कमाई केली आहे. विकेंडनंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फिल्म इंडस्ट्रीमधून कौतुकाचा वर्षाव
‘Animal’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वरून ‘कांतारा: चॅप्टर 1’ चे प्रचंड कौतुक केले. त्यांनी लिहिलं , कांतारा हा चित्रपट जबरदस्त आहे.. भारतीय सिनेमाने याआधी असे काही पाहिलेच नव्हते. रिषभ शेट्टीने एकहाती चित्रपट उचलून धरला आहे. अजनीश लोकनाथचे संगीत ठाव घेणारे आहे. विशेषतः पार्श्वसंगीताने कमाल केली आहे. या कौतुकामुळे चित्रपटाबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे.
‘कांतारा: चॅप्टर 1’ हा २०२२ मधील सुपरहिट ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रिक्वेल आहे — म्हणजेच ही कथा पहिल्या चित्रपटाच्या घटनांपूर्वीची आहे. हा चित्रपट सुमारे १००० वर्षांपूर्वी घडतो आणि बनवासीतील कदंब राजवटीच्या काळातील दंतकथा दाखवतो. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः ऋषभ शेट्टी यांनी केलं आहे. मुख्य भूमिकेत ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत, जयाराम, आणि गुलशन देवैय्या दिसतात.







