कोलकाता कसबा सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोजित मिश्रा याच्याविरुद्ध पश्चिम बंगाल बार कौन्सिलने कठोर भूमिका घेतली आहे. बंगाल बार कौन्सिलने आरोपी मनोजितचा वकिलीचा परवाना रद्द केला आहे. यामुळे आता आरोपी मिश्रा राज्यातील कोणत्याही न्यायालयात वकिली करू शकणार नाही. या घटनेबाबत औपचारिक तक्रार मिळाल्यानंतर सात दिवसांनी बार कौन्सिलने कारवाई केली.
दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणात मनोजित मिश्राचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आल्यानंतर आणि त्यानंतर त्याच्या भूतकाळातील गैरकृत्यांचा खुलासा झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आधीच अनेक तक्रारी दाखल असूनही, तो अलीपूर कोर्टात वकिली करत होता.
२ जुलै रोजी झालेल्या बंगाल बार कौन्सिलच्या बैठकीनंतर, आरोपी मिश्राचे नाव वकिलांच्या यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय केंद्रीय बार कौन्सिलला कळवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची गुप्तचर विभागाच्या मदतीने कोलकाता पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेसंदर्भात मिश्रासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
मंडीमध्ये हाहाकार : १३ जणांचा मृत्यू
‘हरसिंगार’ म्हणजेच आरोग्यदायक उपायांचा खजिना
पतंजली विरुद्ध डाबर : बाबा रामदेवांना न्यायालयाचा झटका, दिला हा आदेश!
मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा ठप्प
आरोपी मनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेशी (TMCP) देखील संबंधित होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजनेही त्याला महाविद्यालयाच्या तात्पुरत्या पदावरून काढून टाकले आहे. महाविद्यालय प्रशासनाने दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांनाही काढून टाकले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
