मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत आहेत. लाडक्या बहिणी लाडक्या उद्योजिका बनत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. झेप फाउंडेशनच्यावतीने विकसित भारत महिला उद्योजिका २०२५ च्या संमेलनाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, उपायुक्त डॉ.प्राची जांभेकर, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेप’च्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह बचत गटाच्या महिला आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जागतिक महिला दिन हा स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा लाभ महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचा आपण आधार होऊ शकतो याचे समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा..
संतोष देशमुख प्रकरण: वाल्मिक कराडंच मुख्य सूत्रधार, खंडणीसाठी केली हत्या
त्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक
मराठी उद्योजकांनी निर्यात क्षेत्रातील संधींचा फायदा घ्यावा
प्रयागराजमध्ये हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर आढळले गायीचे शिर
झेप फाउंडेशनने अशा महिलांना एकत्रित करून त्यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. महिलांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिलांचेही कुटुंबातील योगदान वाढावे यासाठी हा प्रयत्न आहे. गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. ज्या महिला शासनाच्या या प्रयत्नांना साथ देत आहेत, चौकटी आणि रूढी परंपरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना आणि ज्या भगिनी त्यांना यासाठी सहकार्य करीत आहेत अशा सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.
प्रधान सचिव अश्विनी भिडे म्हणाल्या की, जिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर महिलाही आपले ध्येय गाठू शकतात. लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही उद्यमशील बनवू शकतो. महिलांसाठी आकाश मोकळे आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम राज्य शासन करीत असून केवळ महिलांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीने हे साध्य होणार असल्याचे श्रीमती भिडे यांनी यावेळी सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.