पहलगाम येथील प्राणघातक दहशतवादी हल्ल्यामागील कथित सूत्रधार लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) कमांडर सैफुल्लाह कसुरी बुधवारी (२८ मे) पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी दिसून आला. तो एका राजकीय रॅलीत पाकिस्तानी राजकीय नेत्यांसह आणि इतर वॉन्टेड दहशतवाद्यांसह व्यासपीठावर दिसला.
पाकिस्तानच्या अणुचाचण्यांच्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने (पीएमएमएल) आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषणे आणि भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. उपस्थितांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद देखील होता. भारतानेही त्याला दहशतवादी घोषित केले आहे.
“पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार म्हणून मला दोषी ठरवण्यात आले होते, आता माझे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे,” असे कसुरी रॅलीत म्हणाला. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरीकडे पहिली जाते. हल्लेखोर हे लश्कर-ए-तोयबाच्या द रेझिस्टन्स टास्क फोर्सचे दहशतवादी होते. कसुरीला खालिद म्हणूनही ओळखले जाते.
तो रॅलीत म्हणाला, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा मला दोष देण्यात आला आहे आणि मी जगभर प्रसिद्ध झालो आहे.’ त्याने यावेळी अलाहाबादमध्ये ‘मुद्दासिर शहीद’ नावाने एक केंद्र, रस्ता आणि रुग्णालय बांधण्याची घोषणाही केली. दरम्यान, गुप्तचर सूत्रांनुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने मारलेल्या दहशतवाद्यांपैकी मुदस्सीर अहमद हा एक होता.
