‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१३ मे) सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हवाई दलाच्या जवानांना संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, “जगाने ‘भारत माता की जय’ या घोषणेची ताकद नुकतीच पाहिली आहे. ‘भारत माता की जय’ ही केवळ एक घोषणा नाही. तर ही देशाच्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे, जी भारतमातेच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी आपले जीवन पणाला लावते. हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे जो देशासाठी जगू इच्छितो, काहीतरी साध्य करू इच्छितो.
ते पुढे म्हणाले, मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही सर्वांनी तुमचे ध्येय परिपूर्णतेने साध्य केले. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ आणि त्यांचे विमानतळ नष्ट झाले आहेत. यासह त्यांच्या नापाक योजना आणि धाडसाचाही पराभव झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा भारतीय सैनिक ‘माँ भारती की जय’ असा जयघोष करतात तेव्हा शत्रूचे हृदय थरथर कापते. जेव्हा आपले ड्रोन शत्रूच्या किल्ल्याच्या भिंती उद्ध्वस्त करतात, जेव्हा आपली क्षेपणास्त्रे कर्कश आवाजात लक्ष्यापर्यंत पोहोचतात तेव्हा शत्रूला ‘भारत माता की जय’ असे ऐकू येते.” ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरलेल्या शत्रूने आदमपूरसह आमच्या अनेक हवाई तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला वारंवार लक्ष्य केले, परंतु पाकिस्तानचे नापाक डाव प्रत्येक वेळी अयशस्वी झाले.”
पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या शौर्याला सलाम केला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वांनी अभिमानास्पद कामगिरी केली, इतिहास घडवला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, “जेव्हा शूरांचे पाय पृथ्वीला स्पर्श करतात तेव्हा पृथ्वी धन्य होते. जेव्हा शूरांना पाहण्याची संधी मिळते तेव्हा जीवन धन्य होते. म्हणूनच मी तुम्हाला भेटण्यासाठी पहाटे येथे आलो आहे.
सैनिकांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजपासून अनेक दशकांनंतरही, जेव्हा भारताच्या या शौर्याची चर्चा होईल, तेव्हा तुम्ही आणि तुमचे सहकारी त्याचे सर्वात महत्वाचे अध्याय असाल. तुम्ही सर्वजण देशाच्या वर्तमान तसेच भावी पिढ्यांसाठी एक नवीन प्रेरणा बनला आहात. मी हवाई दल, नौदल, सेना आणि बीएसएफच्या शूर सैनिकांना सलाम करतो.
हे ही वाचा :
भारताचे उद्योग क्षेत्र ३ ट्रिलियन डॉलर संधी निर्माण करणार
आदमपूर एअरबेसला भेट देत पाकिस्तानचा ‘तो’ दावा मोदींनी ठरवला फोल
‘मोदी अंकल’ तुम्ही माझे हिरो आहात!
पंतप्रधानांनी जवानांचे मनोबल वाढवले
ते पुढे म्हणाले, “तुमच्या शौर्यामुळे आज ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रतिध्वनी प्रत्येक कानाकोपऱ्यात ऐकू येत आहे. या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान, प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत उभा होता. प्रत्येक भारतीयाच्या प्रार्थना तुमच्या सर्वांसोबत होत्या. आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैनिकांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आभारी आहे, त्यांचा ऋणी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही एक सामान्य लष्करी कारवाई नाही. ती भारताच्या धोरणाचा, हेतूचा आणि निर्णायकतेचा संगम आहे.”
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात दहशतवाद्यांना इशारा दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तान सेनेच्या भरवश्यावर आतंकवादी बसले होते. मात्र, भारताच्या सेनेने पाकच्या सेनेलाच धूळ चारली. पाकिस्तानमध्ये असे कोणतेही ठिकाण नाही, ज्याठिकाणी आतंकवादी शांततेने श्वास घेवू शकतील. आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना मारू, पळून जाण्याची एकही संधी देणार नाही.
पंतप्रधान पुढे म्हणाले, “दहशतवादाविरुद्ध भारताची लक्ष्मणरेषा आता अगदी स्पष्ट झाली आहे. आता जर कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल, योग्य उत्तर देईल.” दहशतवाद्यांच्या आकांना आता समजले आहे कि भारतावर जर नजर केली तर केवळ विनाश आणि विध्वंस होईल.
