पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित केले. मोदींचे रात्रीचा आठ वाजता भाषण म्हटलं की, अनेकांच्या छातीत धडकी भरते. परंतु काल मोदी काय बोलणार, याचा साधारणपणे अंदाज होता. मोदींचे भाषण
ऐतिहासिक होते. सुस्पष्ट आणि धारधार होते. देशाच्या सेनादलांचे अभिनंदन करताना वैज्ञानिकांनाही त्यांनी धन्यवाद दिले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात तथाकथित विजयाचे ढोल बडवताना, अमेरिका,
चीन, ओमान, कतार, सौदी, इराण, तमाम देशांचे त्यांनी आभार मानले. परंतु मोदींच्या भाषणात ट्रम्प यांच्यासह एकाही नेत्याचा, एकाही देशाचा उल्लेख नव्हता. मोदीचे भाषण काल सगळे जग कान टवकारून ऐकत होते. कारण हा
उगवत्या महासत्तेचा हुंकार होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात पाकिस्तानला इशारा होता. दहशतवादी कारवाया सुरू ठेवाल तर तुमचे अस्तित्वच शिल्लक ठेवणार नाही. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. भारताने या हल्ल्यात जे काही सामर्थ्यांचे दर्शन
घडवले, त्यात वैज्ञानिकांची महत्वाची भूमिका होती. मोदींनी हे कृतज्ञापूर्वक मान्य केले. वैज्ञानिकांना त्यांच्या कर्तृत्वाचे श्रेय दिले. इस्त्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी सांगितले होते की, युद्ध सुरू असताना आमचे दहा उपग्रह पाकिस्तान वर पूर्णपणे लक्ष ठेवून होते. अर्थात हे लक्ष चीनवर सुद्धा असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया या अनेकदा चीन पुरस्कृत असतात. भारताने पाकिस्तानच्या विरुद्ध केलेल्या कारवाईचे एक ठळक वैशिष्ट्य होतं
की भारताचा मारा अचूक होता. जिथे क्षेपणास्त्र धडकायला हवीत, तिथेच ती जाऊन आदळत होती.
हे ही वाचा:
आदमपूर एअरबेसला भेट देत पाकिस्तानचा ‘तो’ दावा मोदींनी ठरवला फोल
पंतप्रधानांनी जवानांचे मनोबल वाढवले
पंतप्रधान मोदींनी सीबीएसई परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
ऑस्ट्रेलियाची शक्ती पुन्हा लॉर्ड्सवर तळपणार?
सरगोधा हवाईतळावर क्षेपणास्त्राद्वारे जो हल्ला त्याची अचूकता लक्षात घ्या. पाकिस्तानची अण्वस्त्र ज्या बंकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती त्या बंकरपर्यंत जाणाऱ्या भुयाराच्या मुखावर मारा करण्यात आला. खरं तर हल्ला त्या बंकरवर सुद्धा करता आला असता. परंतु तो न करता फक्त मुखावर मारा करून भारताने इशारा दिला की तुमची अण्वस्त्र सुद्धा आमच्या
दयेवर आहेत. ही जी अचूकता आहे ती साध्य झाली केवळ आणि केवळ इस्त्रोमुळे. इस्त्रोचे उपग्रह पाकिस्तानच्या एकेक तुकड्यावर लक्ष ठेवून होते. हालचाली टीपत होते. हल्ल्याचे लक्ष्य अचूक अक्षांश, रेखांशासह लष्कराला पुरवत होते. इस्त्रो भविष्याचा विचार करून भारताला सज्ज करण्याचे काम करीत आहे. पाकिस्तानची रग जिरली नाही. भविष्यातही हे चाळे सुरू राहतील. हे लक्षात ठेवून इस्त्रो १८ मे रोजी EOS-09 हा आणखी एक उपग्रह आकाशात पाठवणार आहे.
भारताचे रिसोर्ससॅट, कोर्टोसॅट, रिसॅट हे इस्त्रोचे उपग्रह टेहाळणीसाठी कार्यरत आहेत, त्यात ही महत्वाची भर पडणार आहे. हाय रिझॉल्यूशनचे फोटो काढणे हे ईओएस-०९ चे वैशिष्ट्य राहणार आहे. उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तानच्या भूमीवर काय चाललंय हे एक मीटर अंतरावरून जेवढे स्पष्ट दिसेल तेवढे भारतीय संरक्षण यंत्रणा पाहू शकणार आहेत. रात्रंदिवस कोणत्याही नैसर्गिक परिस्थितीमध्ये हा उपग्रह तेवढ्याच क्षमतेने काम करू शकतो, हे विशेष. चीन-पाकिस्तानला धडकी भरवण्यासाठी आणखी एक तिसरा डोळा अंतरिक्षातून नजर ठेवणार आहे. येत्या काळात पाकिस्तानशी संघर्ष भडकलाच तर भारताची त्याच्यावर अधिक करडी नजर असेल. भारत-पाक संघर्षात देशी बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने रशियाच्या एस-४०० सह भारताच्या सीमेवर एक अभेद्य भिंत बनवली. ही भिंत भेदणे पाकिस्तानला शक्य झाले नाही. पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्र भारताच्या एकाही लष्करी तळापर्यंत पोहोचू शकली नाहीत. रशियाच्या सहकार्याने तयार केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र मात्र पाकिस्तानवर वीजेच्या लोळाप्रमाणे कोसळली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांची कोणतीही तोड पाकिस्तान काय चीन आणि अमेरिकेकडेही सध्या तरी उपलब्ध नाही. पाकिस्तानच्या हवाई तळांवर ब्रह्मोसच्या माऱ्याने निर्माण झालेली विवरे सगळ्या जगाने पाहीलेली आहेत. त्यांची अचुकता मान्य केली आहे.
पाकिस्तानला ठोकताना जगाला भारताने तंत्रज्ञानाचा चमत्कार सुद्धा दाखवला. इस्त्रो, डीआरडीओ गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांचा कायापालट झालेला दिसतो. मोदींनी या संस्थांना कोणतीही साधनसामुग्री कमी पडणार नाही, यावर जातीने लक्ष दिले. इस्त्रोच्या सामर्थ्याची दखल अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने सुद्धा घेतलेली आहे. सरगोधामध्ये भारतीय मिसाईल द्वारे मारा झाला त्यानंतर तिथे किरणोत्सर्ग झाल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या डीपार्टमेंट ऑफ एनर्जीने या किरणोत्सर्गाची दखल घेऊन तपासासाठी पाकिस्तानमध्ये एक विमान रवाना केले आहे. इजिप्तनेही किरणोत्सर्ग रोखण्यासाठी प्रभावी असलेल्या बोरोनचा साठा
असलेले जहाज रवाना केले आहे. अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने येत आहेत. भारताने जिथे क्षेपणास्त्रांचा मारा केला जिथे अण्वस्त्र होती. त्या किराना हिल्स येथे ४.१ ते ४.५ रिस्टर स्केलचे भूकंप होत असल्याची चर्चा आहे.
पाकिस्तानमध्येही उलथापालथ नरेंद्र मोदी यांनी घडवली आहे. तुमच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही, हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. कालच्या भाषणात त्यांनी हे स्पष्ट सांगितले की आम्ही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. भारताने केलेल्या माऱ्यात पाकिस्तानची अण्वस्त्र नष्ट झाली का? झाली असली तर ती किती प्रमाणात नष्ट झाली? याचा अजून जगाला अंदाज नाहीये. जे काही घडलंय ते फक्त पाकिस्तानला माहित. भविष्यात भारताला पाकिस्तानकडून जर धोका असेल तर तो पारंपारिक युद्धाने नाहीये. तो धोका पाकिस्तान आणि चीनच्या अण्वस्त्रांचा आहे. भारताचे अंतरीक्षात असलेले उपग्रह चीन- पाकिस्तानच्या अण्वस्त्रतळांवर बारीक नजर ठेवणार आहेत. त्यांच्या हालचाली
टीपणार आहेत. पाकिस्तानने अशा प्रकारची कुरापत करण्याआधीच मोदी पाकिस्तानचा बंदोबस्त करतील असा भारतीयांना दुर्दम्य विश्वास आहे. मोदीवर भारताचा विश्वास आहे, मोदींचा विश्वास आपल्या वैज्ञानिकांवर आहे. त्यांनी आपल्या भाषणात वैज्ञानिकांना का धन्यवाद दिले, त्याचे कारण हे असे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे भाषण होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा जाहीर करून मोकळे झाले होते की, माझ्यामुळे शस्त्र संधी झाली. एक गोष्ट उघड आहे की, ट्रम्प या शस्त्रसंधीचे श्रेय घेण्यासाठी प्रचंड आतुर होते, उतावळे होते. त्यांचा हा उतावीळपणा अवघ्या जगाच्या लक्षात आला. हेही जगाच्या लक्षात आले असेल की, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही. त्यांना अनुल्लेखाने टाळले. त्याला कोणत्याही प्रकारच श्रेय दिले नाही, की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत. ट्रम्प यांना त्यांनी सूचक इशारा दिला की फार डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नका. भारताला अमेरिकेची जेवढी गरज आहे तेवढीच अमेरिकेलाही भारताची गरज आहे. युद्धविराम झालेला आहे, परंतु पाकिस्तानची कुरापत थांबलेली नाही. मोठ्या युद्धा आधीचा संधी काळ आहे. येत्या काळात होणारे युद्ध कदाचित अधिक भीषण असेल. तेव्हा भारताच्या मारक क्षमता अधिक धारधार करण्यासोबत,
सीमेवरील संरक्षण भिंत अधिक मजबूत करण्याचे आव्हान आपल्या वैज्ञानिकांसमोर असेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
