भारताचे आघाडीचे शटलर किदांबी श्रीकांत आणि मिश्र दुहेरीतील जोडी तनिषा क्रॅस्टो व ध्रुव कपिला यांनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
दिर्घकाळ फारशी चमक न दाखवू शकलेला आणि सध्या जागतिक क्रमवारीत ६५व्या स्थानावर असलेला श्रीकांत याने गुरुवारी दुसऱ्या फेरीत आयर्लंडच्या नहत गुयेनचा ५९ मिनिटांमध्ये २३-२१, २१-१७ असा पराभव करत आपली पुनरागमनाची छाप सोडली. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ फ्रान्सच्या टोमा जूनियर पोपोवशी पडणार आहे. पोपोवने भारताच्या आयुष शेट्टीला २१-१३, २१-१७ असे पराभूत केले.
दुसरीकडे, मिश्रित दुहेरी प्रकारात तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांनी फ्रान्सच्या ली पालेर्मो आणि जूलियन मॅयो यांच्यावर २१-१७, १८-२१, २१-१५ असा विजय मिळवला. त्यांना आता चीनच्या जियांग जेन बॅंग आणि वेई या शिन या जोडीचे आव्हान पेलावे लागणार आहे.
एच. एस. प्रणयने दुसऱ्या फेरीत जपानच्या युशी तनाका याच्याविरुद्ध झुंजार खेळ केला, मात्र त्याला ९-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेत सतीश करुणाकरणला फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोवकडून १४-२१, १६-२१ असा पराभव स्विकारावा लागल्याने तो बाद फेरीतच स्पर्धेबाहेर गेला.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत प्रणयने जपानच्या पाचव्या मानांकित केंटा निशिमोटो याला ८२ मिनिटांच्या लढतीनंतर १९-२१, २१-१७, २१-१६ असे पराभूत केले होते. श्रीकांतनेही चीनच्या सहाव्या मानांकित लू गुआंग जूवर २३-२१, १३-२१, २१-११ अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. त्याआधी, त्याने क्वालिफायर फेरीत तैवानच्या कुओ कुआन-लिन आणि हुआंग यू काई यांच्यावर विजय मिळवून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले होते.
महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला विएतनामच्या गुयेन थुई लिन्हकडून ११-२१, २१-१४, १५-२१ असा पराभव सहन करावा लागला.
मिश्र दुहेरीत कपिला आणि क्रॅस्टो जोडीने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या इंदाह काह्या सरी जमील आणि अदनान मौलाना यांच्यावर २१-१८, १५-२१, २१-१४ असा विजय मिळवला होता.
