ग्रीसमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या माहितीनुसार, क्रेते बेटाच्या किनाऱ्याजवळ गुरुवारी सकाळी हा भूकंप झाला. संस्थेने सांगितले की, भूकंप सकाळी ६.१९ वाजता झाला, जो क्रेतेच्या ईशान्येला एलौंडा येथून ५८ किलोमीटर दूर आणि जमिनीखाली सुमारे ६० किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे युरोपियन अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा जारी केला आहे. अहवालांनुसार, सुदैवाने या भूकंपामुळे कुठलीही मोठी हानी झाली नाही. मात्र भूकंपाचे धक्के क्रेते आणि आजूबाजूच्या बेटांवर जाणवले, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराट निर्माण झाली.
भूकंपानंतर अनेक सौम्य झटकेही जाणवले गेले असून, क्रेतेमधील अग्निशमन विभागाला सतर्क ठेवण्यात आले आहे. भूकंप नियोजन व सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष एफथिमियोस लेक्कास यांनी ग्रीसच्या राष्ट्रीय प्रसारक ‘ईआरटी’शी बोलताना सांगितले की, “भूकंपाचे केंद्र बहुधा समुद्रात होते अशी शक्यता आहे. ग्रीस ही अनेक महत्त्वाच्या विवर्तन रेषांवर वसलेली भूमी आहे आणि तिथे सातत्याने भूकंपीय हालचाली होत असतात. हे ठिकाण युरोपातील सर्वात भूकंप-संवेदनशील प्रदेशांपैकी एक मानले जाते, कारण हे अफ्रिकन आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या संमिश्र सीमारेषेवर स्थित आहे.
हेही वाचा..
उत्तर कोरियाचे युद्धनौका प्रक्षेपण अपयशी
देशविरोधी कारवाया करणाऱ्या ज्योती मल्होत्राची रवानगी पोलिस कोठडीत
“ज्यांनी भारताचे रक्त सांडले त्यांना प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागली”
यापूर्वी सोमवारी ग्रीसच्या इविया बेटावरील एका भागात शाळा बंद करण्यात आल्या होत्या, कारण सप्ताहअखेर अनेक भूकंप झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला होता. अॅथेनच्या नॅशनल ऑब्झर्व्हेटरीच्या माहितीनुसार, रविवारी जवळपास तीन भूकंपाचे झटके बसले, ज्यांची तीव्रता ४.१ ते ४.५ दरम्यान होती. त्यानंतर आणखी काही सौम्य झटकेही आले. या भूकंपाचे केंद्र इविया बेटाच्या मध्यभागी प्रोकोपी गावाजवळ होते. सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी सकाळी आलेला सर्वात तीव्र भूकंप ४.५ तीव्रतेचा होता, जो ग्रीसची राजधानी अॅथेनमध्येही जाणवला. याचे केंद्र अॅथेनपासून सुमारे ८० किमी दक्षिणेला होते.
मंटौडी-लिमनी-अगिया अन्ना नगरपालिकेचे महापौर जिओर्गोस त्सापुरनियोटिस यांनी सांगितले की, या भूकंपाच्या झटक्यांमुळे किमान २० घरे, दुकाने आणि एक मठ यांचे नुकसान झाले आहे. याआधी १३ मे रोजी अमेरिकेच्या यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नेही ग्रीसमध्ये ६.१ तीव्रतेचा एक मोठा भूकंप झाल्याचे नोंदवले होते.
