26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरविशेषशिवाजी महाराजांची वाघनखे कुणाला टोचत आहेत?

शिवाजी महाराजांची वाघनखे कुणाला टोचत आहेत?

वाघनखे भारतात येणार म्हटल्यावर विरोधकांकडून टीका

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणली जाणार आहेत. हा सध्या सर्वांच्या कुतुहलाचा विषय असला तरी महाराष्ट्रात मात्र या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांनी वाघनखांवरून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचे ठरविले आहे. कारण गेल्या वर्षभरात त्यांना प्रत्येक मुद्द्यावर फक्त प्रश्न उपस्थित करण्याची सवय लागली आहे. प्रश्न विचारायलाही हरकत नसते पण त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा लागतो, काहीतरी तर्क असावा लागतो. शिवाय, प्रश्नांची उत्तरे संबंधितांनी दिली तर आपले त्यामुळे समाधान झाल्याची भावनाही असावी लागते. पण सध्या विरोधकांमध्ये ती भावना दिसत नाही. त्यांना केवळ प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि त्यातून आपणच खरे काहीतरी मांडत आहोत, असे चित्र उभे करायचे आहे. शिवाय, हे प्रश्न विचारणे म्हणजे जणू आपल्याला न विचारताच, आपल्याला माहिती न देताच सगळे निर्णय सरकार घेत आहे, असा आवही आणायचा. त्यातूनच मग हा करार कसा झाला, किती खर्च झाला, कशासाठी दौरा काढला असे सवाल आदित्य ठाकरे व इतर विरोधी पक्षातील नेते विचारतात.

 

 

वाघनखांवरून अगदी असेच राजकारण चालले आहे. अफझलखानाला ज्या वाघनखांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी मारले तीच ही वाघनखे आहेत का की शिवकालीन आहेत असे प्रश्न आदित्य ठाकरे विचारत आहेत. तसेच ही वाघनखे आणताना नेमका काय करार झाला आहे, ती कर्जस्वरूपात घेतली आहेत की कुठल्या वस्तूच्या बदल्यात घेतली आहेत, असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांच्या डोक्यात घोंघावत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे ते संबंधित मंत्र्याना भेटूनही विचारू शकतात पण त्यांना त्याच्याशी काही मतलब राहिलेला नाही. केवळ प्रश्न विचारायचे आणि रान उठवायचे ही भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे. तिकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गजानन मेहेंदळे यांच्या एका पुस्तकातील दाखला देत दावा केला आहे की, अशा कोणत्याही वाघनखांनी शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारलेले नाही, असे मेहेंदळे म्हणतात म्हणजे त्यावर विश्वास ठेवला तर वाघनखे आणण्याचे काही औचित्यच नाही.

 

 

अर्थात, आव्हाड हे नेहमीच आपल्या सोयीप्रमाणे इतिहासाचे आकलन करतात. त्यामुळे वाघनखांच्या बाबतीत राजकारण करताना ते सोयीचा इतिहास दाखला म्हणून दाखवतात. खरे तर तसेही आव्हाड हे अफझलखानाच्या बाबतीत नेहमीच सौम्य राहिलेले आहेत. अफझल खान हा स्वतःच्या सीमा वाढविण्यासाठी आला होता, तो काही इस्लामचा प्रचार करण्यासाठी आला नव्हता असे आव्हाड यांनी मागे छातीठोकपणे सांगितले होते त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी मारलेच नाही, हे सांगण्यासाठी मेहेंदळेंचा हा दाखला द्यावा लागला. कदाचित भविष्यात शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारलेच नाही तर अफझलखान अपघातानेच मेला असेही सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जाऊ शकेल.

 

 

 

मुळात ही वाघनखे भारतात येत आहेत, त्याबद्दल सर्वांच्या मनात कुतुहल आहे. त्या वाघनखांनी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला अथवा नाही यापेक्षा ती वाघनखे त्या काळातील आहेत, हे महत्त्वाचे. वाघनखांबाबतचे अनेक संदर्भ याआधीही आलेले आहेत. अगदी महात्मा फुले यांच्या पोवाड्यातही ते वाघनखांचा उल्लेख करतात याचा अर्थ तेव्हापासून वाघनखांबाबतचे संदर्भ दिले जात आहेत. तरीही विरोधक वाघनखांबाबत शंका उपस्थित करतात हा तद्दन रडीचा डाव आहे.

 

 

 

मुळात हे सगळे केवळ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला विरोध करण्यापुरते आहे असे म्हणता येत नाही. तर हे सगळे आपल्या विचारधारेला साजेसे राजकारण करत आहेत. २०१९मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग केला गेल्यानंतर महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेबद्दल अधिक तावातावाने बोलले जाऊ लागले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल कमी बोलायचे कारण ते बोलायचे तर त्यांनी मुस्लिम किंवा इस्लामी आक्रमकांना कसा धडा शिकविला, त्यांच्या तावडीतला प्रदेश सोडवून स्वराज्य कसे स्थापन केले, मुघल, आदिलशाही, निजामशाही यांचा कसा बंदोबस्त केला हे सांगावे लागेल. अर्थातच, तिथे मग ‘मुस्लिमां’चा संबंध आला. मग आली पंचाईत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी बोलायचेच नाही.

हे ही वाचा:

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

अविनाश साबळेची सोनेरी धाव!

तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक केले ‘ट्रॅप’

 

प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीपाशी असलेले अनधिकृत बांधकाम सरकारने तोडले तर त्यावर ब्र काढायचा नाही कारण मुस्लिम मतदार दुखावतील. त्यापेक्षा औरंगजेबाचे गुणगान करायचे, त्याच्या कबरीवर चादर चढवायला जायचे, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना मुस्लिमांना दुखावण्याचा हेतू असतो असे संकेत द्यायचे हेच खरे कारण आहे, वाघनखांना विरोध करण्याचे. बरे विरोधकांनी आपण सत्तेत असताना हा प्रयोग काही केला नाही. मराठी माणूस, महाराष्ट्राचे हित अशा गोष्टी करताना आपणही वाघनखे भारतात आणू, लोकांनी त्या इतिहासाचे स्मरण करून देऊ असे त्यांना वाटले नाही. यावरून विरोधकांना केवळ सरकारवर चिखलफेक करायची आहे, हेच स्पष्ट होते. त्यामुळेच त्यांना ही वाघनखे टोचत आहेत. त्या वाघनखांबद्दल त्यांच्या मनात अभिमान वगैरे अजिबात नाही. शिवाजी महाराज फक्त प्रचारसभेत हार घालण्यापुरतेच यांच्यासाठी राहिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा