महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यावर विजयाचा जल्लोष कुठे दिसला नाही. उलट राज्यभर सन्नाटा पसरला होता. या निकालावर विश्वासच बसू शकत नाही. निवडून आलेल्यांचा सुद्धा विश्वास बसला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकांनी मतदान केले आहे मात्र ते पोहोचलेच नाही. ते गायब झाले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला.
मुंबईतल्या वरळी इथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, लोकसभा निवणुकीत सर्वाधिक खासदार काँग्रेस पक्षाचे आले होते, त्यांचे केवळ १५ आमदार निवडून यावेत, तोच प्रकार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडला. असा चार महिन्यात काय फरक पडला ? असा सवाल त्यांनी विचारला. ४-५ आमदार निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात असताना अजित पवारांचे ४२ आमदार निवडून कसे काय आले? हा सगळा संशोधनाचा विषय आहे. जर असे प्रकार होणार असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या असेही ते म्हणाले.
हेही वाचा..
चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
लग्नात भेट झाली की युती होते, हा भाबडा विचार!
महाकुंभ: मिलिंद सोमणचे सपत्नीक संगमात स्नान, म्हणाला ‘धन्य’ वाटले!
राजधानीत मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची गोष्ट!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे. राजकीय अफवा पसरवणाऱ्यांना जशासतसे उत्तर द्यायला हवे, तेवढा राजकीय अभ्यास असायला हवा, असे आवाहन सुद्धा त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. लोकांच्यात जाऊन विश्वास संपादन करावा. आपण ज्या गोष्टी महाराष्ट्रासाठी ठरवल्या आहेत त्या पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे म्हणाले, माझ्यावर भूमिका बदलण्याचा आरोप केला जातो आणि माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जाते. भूमिका बदलणे म्हणजे काय ? हे आधी समजून घेतले पाहिजे असे सांगून त्यांनी भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून देशात कोणकोणत्या राजकीय पक्षाने कशा भूमिका बदलल्या, याबद्दलची माहिती दिली. अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना लगेच सत्तेत सहभागी करून घेतले. अशा प्रकाराबद्दल माध्यमे त्यांना प्रश्न विचारणार नाहीत. कारण माध्यमामध्ये सध्या असणाऱ्या किती जणांच राजकीय अभ्यास आहे, केवळ दिवस ढकलायचा असा हा सगळा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.