छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट देशभरात धुमाकूळ घालत आहे. लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कादंबरीवर हा चित्रपट आधारित असून लक्ष्मण उतेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘छावा’ चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाच्या यशानंतर शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. याबाबत आणखी मोठी माहिती समोर आली आहे. ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून अमराठी वाचकांसाठी खुली झाली आहे. त्यामुळे अमराठी वाचकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
‘छावा’ चित्रपटाचा जगभरात डंका वाजल्यानंतर कादंबरीची भाषांतरासाठी मागणी वाढली होती. वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘छावा’ कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे. ‘छावा’ कादंबरीचा इंग्रजी अनुवाद कादंबिनी धारप यांनी केला आहे, ज्या लेखक शिवाजी सावंत यांच्या कन्या आहेत. १९७९ मध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. आतापर्यंत या कादंबरीच्या २४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
हे ही वाचा :
ताजे काँग्रेसी टूलकिट जोडते, वक्फच्या मनमानीचा विकसित भारताशी संबंध…
हरियाणामध्ये भाजपाचे ट्रिपल इंजिन सरकार; काँग्रेस हद्दपार!
पंतप्रधान मोदींनी गंगा तलावाचे घेतले दर्शन
संभलमधील जामा मशिदीसह १० मशिदी होळीनिमित्त ताडपत्रीने झाकणार
‘छावा’ कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित करणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता म्हणाले, ‘छावा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर देशातील कानाकोपऱ्यासह जगभरातील वाचकांकडून ‘छावा’ कादंबरीबद्दल विचारणा होऊ लागली. परंतु, मेहता पब्लिशिंग हाऊसने यापूर्वीच या कादंबरीच्या इंग्रजी भाषांतराच्या कामास सुरुवात केली होती. त्यामुळे ‘छावा’ कादंबरीची इंग्रजी आवृत्ती बाजारात उपलब्ध करणे शक्य झाले. दरम्यान, ‘छावा’ कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीमुळे अमराठी वाचकांनाही आता छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास समजणार आहे.