रावलपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या कसोटीत लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानने ९३ धावांनी विजय मिळवला होता, त्यामुळे दुसरा सामना निर्णायक ठरला होता.
पहिल्या डावात पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करत ३३३ धावा केल्या. कर्णधार शान मसूदने ८७, सऊद शकीलने ६६ आणि अब्दुल्ला शफीकने ५७ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकी गोलंदाज केशव महाराजने तब्बल ७ बळी घेत पाकिस्तानचा डाव उद्ध्वस्त केला.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०४ धावा करत आघाडी घेतली. सेनुरन मुथुसामीने नाबाद ८९ धावा तर ट्रिस्टन स्टब्सने ७६ धावा केल्या. पाकिस्तानकडून आसिफ अफरीदीने ६ बळी मिळवले.
दुसऱ्या डावात पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा ढासळली आणि संपूर्ण संघ फक्त १३८ धावांत माघारी फिरला. बाबर आझमने ८७ चेंडूंमध्ये ५० धावा करत झुंजार खेळी केली, पण बाकी फलंदाजांनी निराशा केली. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर हार्मरने या डावात ६ विकेट्स घेतल्या.
विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर ६८ धावांचे सोपे लक्ष्य होते. चौथ्या दिवशी रयान रिकल्टन आणि कर्णधार एडन मार्करम या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. दोघांनी मिळून ११.३ षटकांत ६४ धावांची भागीदारी केली. मार्करमने ४५ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या, तर रिकल्टन २५ धावांवर नाबाद राहिला.
या विजयामुळे मालिकेचा शेवट १-१ अशा बरोबरीत झाला आहे. पुढे दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.







