दोन बंधु एकत्रित येण्याचे श्रेय मला दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार. बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. ‘विजयी मेळावा’ होणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. पण त्याठिकाणी रुदालीचे भाषण देखील झाले. मराठीबद्दल एक शब्द न बोलता फक्त आमचे सरकार गेले, सरकार पाडले, आम्हालाच निवडून द्या. हा मराठीचा विजय नव्हता ही रुदाली होती, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना लगावला.
त्रीभाषा संदर्भात सरकारने आपला निर्णय मागे घेताच ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज मुंबईतील वरळी डोम येथे त्यांचा विजयी मेळावा पार पडला. यावेळी मविआचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला संबोधित केले आणि म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंना जे शक्य झाले नाही ते केले, मला आणि उद्धव यांना एकत्र आणले.”
मराठीच्या विषयावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आणि आगामी मनपाच्या निवडणुकीत सत्ता काबीज करू असे म्हणाले. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपुरातून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा मराठीचा विजय नव्हता ही रुदाली होती. २५ वर्षे महापालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्या लायक ते काहीच काम करू शकले नाहीत. पण मोदींच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा ज्याप्रकारे चेहरा बदलवला, त्यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला.
हे ही वाचा :
७ जुलैला १२ देशांना टॅरिफ पत्रे पाठवली जाणार
जागतिक स्तरावर भारताचे मोठे यश
गाझा युद्धविराम प्रस्तावावर चर्चा सकारात्मक
बिडीडी चाळ, पत्रा चाळ, अभ्युदय नगरातील मराठी माणसाला हक्काचे मोठे घर त्याठिकाणी आम्ही दिले. त्यामुळे मुंबईतील मराठी अथवा अमराठी आमच्यासोबत आहेत. मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत, हिंदुत्वाचा आम्हाला अभिमान आहे. सर्वांना सोबत नेणारे आमचे हिंदुत्व आहे.
