बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात VVPAT (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) चिठ्ठ्या सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एफआयआर नोंदवून निष्काळजी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. माहितीनुसार, सरायरंजन विधानसभा क्षेत्रातील गुडमा गावात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हजारोंच्या संख्येने VVPAT चिठ्ठ्या आढळल्या. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या टीम्स तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जिल्हा निवडणूक पदाधिकारी-सह-जिल्हाधिकारी रोशन कुशवाहा आणि पोलीस अधीक्षक यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित विधानसभा उमेदवारांनाही तिथे बोलावण्यात आले.
यानंतर प्रशासनाने सर्व चिठ्ठ्या जप्त करून पुढील तपास सुरू केला. जिल्हाधिकारी रोशन कुशवाहा म्हणाले, “सरायरंजन थाना क्षेत्रात VVPAT चिठ्ठ्या कचऱ्यात सापडल्याची माहिती मिळाली आहे. हा तांत्रिक (technical) विषय आहे. तपासानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील.” त्यांनी स्पष्ट केलं की, “कमीशनिंग दरम्यान मॉक पोलही घेतला जातो. सुमारे ५ टक्के मशिन्सवर प्रत्येकी १००० मतांचा मॉक पोल होतो, ज्यात उमेदवारांच्या चिन्हांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक बटण दाबून तपासणी केली जाते.”
हेही वाचा..
धर्मेंद्र प्रधानांची राहुल गांधींवर सडकून टीका
मनुस्मृती, रामचरितमानसच्या श्लोकांची आठवण करून देत न्यायालयाने ठोठावली शिक्षा
भारत आणि आर्मेनियाने आरोग्य करारावर केली स्वाक्षरी
भारताचा स्मार्टफोन बाजार गतीने वाढण्यासाठी सज्ज
समस्तीपुरचे पोलिस अधीक्षक (SP) यांनी सांगितलं , “शनिवारी सरायरंजन थाना क्षेत्रातील गुडमा गावात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही कापलेल्या आणि काही न कापलेल्या मतदानाशी संबंधित चिठ्ठ्या सापडल्या. विविध पक्षांच्या उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. हे ठिकाण सरायरंजन विधानसभा क्षेत्रातील डिस्पॅच सेंटरपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आहे.” ते पुढे म्हणाले, “या घटनेच्या संदर्भात सरायरंजन थाना येथे एफआयआर दाखल करण्यात आला असून, आवश्यक ती कारवाई सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून निष्काळजी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे.”
या प्रकरणावर राजद (राष्ट्रीय जनता दल) ने प्रश्न उपस्थित केले आहेत. राजदने ‘एक्स’वर लिहिलं, “समस्तीपुरच्या सरायरंजन विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात VVPAT चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठ्या केव्हा, कशा, का आणि कोणाच्या सांगण्यावर फेकल्या गेल्या? चोर आयोग याचं उत्तर देईल का? की हे सर्व बाहेरून आलेल्या ‘लोकशाहीच्या दरोडेखोरांच्या’ आदेशावर चालतंय?”







