गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील राणी गावावर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडील शेतात धान रोवणीच्या कामात व्यस्त असताना गावातील चार चिमुकले मित्र सती नदीवर आंघोळीसाठी गेले. मात्र नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघा निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक मुलगा सुदैवाने बचावला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास चारही मुले नदीवर पोहण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही क्षणांतच तिघांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात ओढले गेले. स्वतःला वाचविण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न निष्फळ ठरला. या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६), कुणाल रमेश दूधकवर (वय ५) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११) या तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या चौथ्या मुलाला स्थानिक नागरिकांनी वेळेत बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला.
हे ही वाचा:
अभिजीत दिपकेची प्रकृती पुन्हा बिघडली
तरुणांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !
स्पेनमध्ये ६० हजार निर्वासितांची अभूतपूर्व घुसखोरी
जादुमणी सिंहचे सुवर्ण हुकले; रौप्यपदकावर समाधान
घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने नदीकाठी धावले. पुराडा पोलिसांचे पथक आणि स्थानिक प्रशासनही तातडीने घटनास्थळी पोहोचले. शोधमोहीम राबवून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
एका क्षणात तीन चिमुकल्यांचा जीव गेल्याने राणी गावात शोककळा पसरली आहे. सकाळी खेळत-बागडत घराबाहेर पडलेली ही मुले पुन्हा कधीच घरी परतली नाहीत. शेतातील काम आटोपून घरी परतणाऱ्या पालकांना आपल्या लेकरांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या दुर्दैवी घटनेने पावसाळ्यात नद्या, तलाव आणि जलाशयांमध्ये आंघोळ किंवा पोहण्यासाठी जाताना विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







