राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देहरादूनमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रपतींनी सर्वांना योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि ही प्रार्थना केली की योगाच्या माध्यमातून संपूर्ण जगातील नागरिक आरोग्यदायी आणि आनंदी राहोत. आपल्या संबोधनात राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी जगभरातील बहुतांश देशांमध्ये योगाभ्यासाचे आयोजन केले जाते. योग आता मानवतेची एक सामायिक संपत्ती बनली आहे. त्यांनी सांगितले, “योग म्हणजे जोडणे. योगाभ्यासामुळे व्यक्ती आपल्या शरीर, मन आणि आत्म्याला जाणतो आणि तो आरोग्यदायी बनतो. अशाच प्रकारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी, एक समाज दुसऱ्या समाजाशी आणि एक देश दुसऱ्या देशाशी जोडला जातो. हाच विचार लक्षात घेऊन ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ठरवण्यात आली आहे.
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, “भारताच्या पुढाकारामुळे जगभर योगाबद्दलचा सन्मान वाढला आहे. संपूर्ण जग या योगशास्त्राच्या लाभातून समृद्ध होत आहे. योगशास्त्र सहज, सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे हे योग संस्थांचे कर्तव्य आहे. योग संस्था कोणत्याही संप्रदायाशी किंवा पंथाशी जोडलेल्या नाहीत.” त्यांनी हेही स्पष्ट केले की काही लोक चुकीच्या समजुतींमुळे योगाला एका विशिष्ट समुदायाशी जोडतात, पण तसे मुळीच नाही. “योग ही जीवन जगण्याची एक कला आहे, जी आत्मसात केल्याने शरीर, मन आणि एकूण व्यक्तिमत्त्वाला लाभ होतो.
हेही वाचा..
उपवन पवन जैन अखेर भारताच्या ताब्यात
‘ऑपरेशन सिंधू’अंतर्गत इराणमधून २९० नागरिकांची तुकडी भारतात दाखल!
योगामुळे पंतप्रधान मोदी तंदुरुस्त
ट्रम्प-मुनीर भेट पाकिस्तानसाठी लाजिरवाणी!
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले की, “योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले पाहिजे. असं म्हटलं जातं की ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’, आणि म्हणूनच ही संपत्ती टिकवणं आपलं कर्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण या प्राचीन परंपरेचा उत्सव साजरा करतो. भारताने जगाला दिलेले हे अमूल्य देणं लाखो लोकांमध्ये शांती, शक्ती आणि एकतेचा प्रसार करत आहे. भारताच्या पाच हजार वर्ष जुन्या संस्कृतीत निहित योगाचे हे शाश्वत ज्ञान आज सीमारेषांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवतेला आरोग्य आणि सौहार्द देत आहे.
