31.1 C
Mumbai
Sunday, June 14, 2026
घरसंपादकीयट्रम्पसोबत पंगा घेण्याच्या तयारीत

ट्रम्पसोबत पंगा घेण्याच्या तयारीत

Google News Follow

Related

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख Transactional (सौदेबाज), Radical (टोकाचे निर्णय घेणारा) या शब्दात करतात, तेही युरोपियन देशांच्या नेत्यांच्या समोर. ‘तुम्ही वाटेल ते सांगाल आणि आम्ही तसे करू, ही अपेक्षा ठेवू नका’ असे सुनावतात, हा अमेरिकेसाठी मोठा संकेत आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, ‘लादण्याचा प्रय़त्न केला तर संबंध बिघडतील, भारताला गृहीत धरू नका’, असा इशाराचा जयशंकर यांनी दिला आहे.

ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशी असलेल्या दोन व्यापारी जहाजांवर अमेरिकी नौदलाने हल्ला केला. पहीला हल्ला ८ जून रोजी पालाऊ देशाच्या एमटी मारिव्हीक्स अमेरिकेच्या एफ/१८ सुपर हॉर्नेट या लढाऊ विमानाने क्षेपणास्त्र डागले. सुदैवाने ओमाच्या हवाईलाच्या हेलिकॉप्टरने जहाजावर असलेल्या सर्व भारतीय खलाशांची सुटका केली.
दुसरा हल्ला एमटी सेटेबोलो या जहाजावर १० जून रोजी झाला. त्यात २४ पैकी ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. दोन्ही जहाजे भारतीय नव्हती, परंतु त्यावर भारतीय खलाशी होते.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याची अत्यंत तीव्र प्रतिक्रीया दिली. नवी दिल्लीतील प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांची गेल्या तीन दिवसात दोन वेळा बोलावून खरडपट्टी काढली. व्यापारी जहाजांवर हल्ले करू नका, असे बजावले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या हल्ल्याचे समर्थन केले आहे. ही दोन्ही जहाजे अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये होती, त्यामुळे हा हल्ला करण्यात आला असे सांगितले आहे.

फिनलॅंडमध्ये झालेल्या कुल्तारांता टॉक्स हा परिसंवादा दरम्यान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्रम्प यांच्यावर केलेल्या तिखट टीकेमागे ही पार्श्वभूमी होती. तुमच्या सोयीने निर्बंध लावायचे आणि तुमच्या सोयीने हटवायचे, असा हा प्रकार आहे. इथे बसलेले सगळेच परिपक्व आहेत. काय खेळ सुरू आहे, हे सगळ्यांना व्यवस्थित समजते. कोणी उगाचच नैतिकतेचा आव आणून आम्हा धडे देऊ नये, असे जयशंकर यांनी सुनावले. समोर बसलेल्या युरोपियन देशांच्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली. भारताने निर्मिती केलेल्या शस्त्रांमुळे कोणताही देश असुरक्षित झालेला नाही, परंतु युरोपने तयार केलेली शस्त्रे वापरून भारतावर अनेकदा हल्ला झालेला आहे.

भारताने अमेरिकेला जशास तसे उत्तर दिल्याची ही पहीली घटना नाही. भारत अमेरिके दरम्यान मुक्त व्यापार करार करण्यासाठी अमेरिकी शिष्टमंडळ भारतात आले होते. याच दरम्यान ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा टेरीफ लादले. त्याचा थेट परीणाम या चर्चेवर झाला. आधी तुम्ही टेरीफ मागे घ्या, नंतर चर्चा करू अशी स्पष्ट भूमिका भारताने केली आणि अमेरिकी शिष्टमंडळाला रवाना केला. ट्रम्प प्रशासनाने भारतावर १२.५ टक्के अतिरिक्त टेरिफ लावले. ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकी शिष्टमंडळ तेव्हा भारतात होते. टेरीफचे वृत्त आल्यानंतर त्यांची पार गोची झाली. भारताने स्पष्ट शब्दात बजावले, जोपर्यंत अमेरिका हे एकतर्फी टेरीफचे धोरण मागे घेत नाही, तोपर्यंत ट्रेड डील नाही. व्यापार करार झाल्यानंतर टेरीफ लावणार नाही, अशी लेखी भारताने मागितली. ती देण्याचे अधिकार लिंच यांच्या शिष्टमंडळाकडे नसल्यामुळे त्यांना हात हलवत परत जावे लागले.

हे ही वाचा:

ममतांना आणखी एक धक्का; सुदीप बंदोपाध्याय बंडखोरांसोबत

आसाममध्ये प्रौढांना आधारकार्ड देण्यास निर्बंध

२००० किमीचा प्रवास…टँकरमध्ये अडकले होते क्षेपणास्त्र, भारतीय नौदलाने केले ‘ऑपरेशन’

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे सेनाप्रमुख

ही भारताने ट्रम्प यांच्या धोरणांना दिलेली थप्पड होती. आम्हाला व्यापार कराराची कोणतीही घाई नाही, कोणतीही डेडलाईन आम्हाला मान्य नाही. जेव्हा व्यापार करार आमचे हित जपणारा आहे, असे आम्हाला वाटेल तेव्हाच हा करार होईल, असे मत वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी वारंवार व्यक्त केले आहे.

म्हणजे आधी व्यापार करार ट्रम्प लोंबकळवत होते. आता भारत लोंबकळवतो आहे. ट्रम्प यांनी भारताला दणका देण्याचा प्रयत्न केला. टेरीफ अस्त्राचा वापर केला. भारताच्या अर्थकारणावर त्याचा काडीचाही फरक पडला नाही. २०२६ च्या अखेरच्या तिमाहीत भारताने ७.१ अब्ज डॉलर इतका करंट अकाऊंट सरप्लस नोंदवला आहे. म्हणजे आपल्या आयातीच्या तुलनेत निर्यात जास्त राहीली. आधीच्या दोन तिमाहीत हा आकडा नकारात्मक होता. २०२६च्या अखेरच्या तिमाहीत भारताचा विकास दरही ७.८ टक्के राहीला. एकूण वर्षभराचा विकास दर ७.६ टक्के राहीला.

व्यापार कराराच्या संदर्भात जे काही घडले, त्याचा जगभरात फारसा गवगवा झाला नाही. कारण जगाचे लक्ष पश्चिम आशियातील तणावावर आहे. परंतु जयशंकर जे काही म्हणाले त्याची मात्र जगभरात जोरदार चर्चा होते आहे. फिनलॅंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांनी जयशंकर यांच्या या विधानानंतर भारताचे कौतूक केले आहे. भारत हा अतिशय प्रभावशाली देश असून आजच्या अनिश्चित जागतिक परिस्थितीत भारताचा दृष्टीकोन समजून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

जयशंकर यांच्या विधानामुळे युरोपचे नेते प्रचंड खूष झाले असणार. कारण जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या ज्या लहरीपणावर शरसंधान केले आहे, त्याचा सगळ्यात मोठा फटका युरोपातील देशांना बसला आहे. ट्रम्प यांच्या याच धोरणांमुळे नाटोचे धिरडे झाले आहे. त्यांना जे बोलायचे आहे, परंतु बोलता येत नाही ते जयशंकर यांच्या तोंडून बाहेर पडल्यामुळे या देशांचे नेते जयशंकर यांच्या बुलडोझर डीप्लोमसीवर फिदा झाले असणार.

ट्रम्प खोटारडे आहेत. व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याचे खापर त्यांनी इराणवर फोडले. त्यांच्या देशाची सेंट्रल कमांड एका बाजूला हल्ल्याचे समर्थन करते, दुसऱ्या बाजूला ट्रम्प त्याचे खापर इराणवर फोडतात हे विनोदी आहे. परंतु ट्रम्प यांची धोरणे अशीच आहेत. इतका प्रकार केल्यानंतर पुन्हा ते निर्लज्जपणे सांगतील की मोदी इज माय फ्रेंड, ही इज ग्रेट लीडर, इंडीया इज ए ग्रेट कंण्ट्री. त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत भारत- अमेरिका संबंध नीचतम पातळीवर आले आहेत. क्वाडचे काय होणार अशा प्रश्न अमेरिकी सुरक्षा तज्ज्ञांना पडलेला आहे. इंडो पॅसिफिकमध्ये अमेरिका चीनचा मुकाबला कोणाच्या जीवावर करणार? कारण या गटातील जपान, ऑस्ट्रेलिया हे दोन देश आधीच ट्रम्प नीती समजून गेले आहेत. भारतही शहाणा झाला आहे. अमेरिका आणि भारताचे शत्रूत्व निर्माण होईल असे कोणतेही कारण अस्तित्वात नाही. परंतु ट्रम्प ते निर्माण करतायत. कुल्तारांता येथे भारताने ट्रम्प यांचा जाहीर पंचनामा करून स्पष्ट संकेत दिलेले आहेत. अंगावर आलात तर शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे. परंतु चीन, रशिया आणि भारत या तीन देशांना एकत्र अंगावर घेण्याची अमेरिकेची तयारी आहे का? इराणला चेपताना अमेरिकेच्या तोंडाला फेस आला आहे. त्यातून ट्रम्प यांना शहाणपणा सुचला तर अमेरिकेचे भले होईल. भारत एका मोठ्या स्थित्यंतरातून जातो आहे. भारत हा एक मजबूत आणि प्रभावी देश असल्याचे स्नब यांनी जाहीरपणे सांगितले आहे. ते ट्रम्प यांना ठाऊक नसण्याचे काही कारण नाही, तरीही भारताच्या वाईटात जायचे असेल तर त्यांनी प्रयत्न करून पाहावा.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा