पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे पोहोचले असून स्लोव्हाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचे स्वागत केले. स्लोव्हाकियाच्या पारंपरिक पद्धतीनुसार पंतप्रधान मोदी यांचे भाकर आणि मीठ देऊन स्वागत करण्यात आले.
स्लोव्हाकियात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, हा दौरा भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच, स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आणि पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत होणाऱ्या फलदायी बैठकींची ते उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले आहे की, “मी ब्रातिस्लावा येथे पोहोचलो आहे. हा दौरा भारत-स्लोव्हाकिया संबंध अधिक मजबूत करण्याची आणि सहकार्याचे नवे मार्ग शोधण्याची संधी देणारा आहे. राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी आणि पंतप्रधान फिको यांच्यासोबतच्या फलदायी चर्चांची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
स्लोव्हाक परंपरेनुसार मान्यवर आणि पाहुण्यांचे स्वागत भाकर आणि मिठाच्या छोट्या ताटाने केले जाते. भाकर ही समृद्धीचे प्रतीक मानली जाते, तर मीठ हे मैत्री, आदर आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. स्लोव्हाकियातील मायजावा भागातील प्रसिद्ध बाल लोककला समूहानेही पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी पारंपरिक स्लोव्हाक नृत्य सादर केले. याशिवाय, लुक्निका एन्सेम्बलने ‘वंदे मातरम्’वर विशेष सादरीकरण केले. तसेच, पंतप्रधानांनी स्लोव्हाकियन संगीत समूह ‘महादेव कीर्तन प्रोजेक्ट’चे आध्यात्मिक सादरीकरणही पाहिले.
ब्रातिस्लावा येथे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली. ग्रँड हॉटेल रिव्हर पार्क येथे पोहोचल्यावर भारतीय समुदायाने त्यांचे उत्साहात स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर लिहिले, “पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियात पोहोचले आहेत. स्लोव्हाकियाच्या स्वातंत्र्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असून, भारत-स्लोव्हाकिया संबंधांतील हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. हॉटेलमध्ये आगमनानंतर स्लोव्हाक रिपब्लिकचे परराष्ट्र व युरोपीय व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचे स्वागत केले. आदरातिथ्य, सन्मान आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून स्लोव्हाक परंपरेनुसार भाकर आणि मीठ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बळकट होतील आणि भागीदारीसाठी नवे मार्ग खुले होतील.”
हे ही वाचा:
प्रतीक्षा संपली! पहिलं विमान नोएडा विमानतळावर उतरलं
अमेरिका- इराण शांतता करार पूर्ण! होर्मुझ सामुद्रधुनी आता खुली
‘हेल्दी’ आणि ‘ऑर्गॅनिक’च्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल
तृणमूलचे बंडखोर खासदार नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत होणार विलीन?
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी ब्रातिस्लावा येथे पोहोचले असून, हा दौरा भारत-स्लोव्हाकिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.







