30.2 C
Mumbai
Sunday, June 21, 2026
घरसंपादकीयओमराजे बोलले तेच खरं कारण! 'या निष्ठेचं करू काय?'

ओमराजे बोलले तेच खरं कारण! ‘या निष्ठेचं करू काय?’

Google News Follow

Related

उबाठा शिवसेनेचे ६ खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहेत. ते ठरलेही आहे. खासदारांनी उचललेल्या या पावलामुळे उबाठा शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे, हे लपलेले नाही. प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रत्येक वाक्यातून ती अस्वस्थता शिव्यांच्या रूपात बाहेर पडते आहे. मग आरोप होत आहेत की, या खासदारांनी पैसे घेतले, त्यांना आमिष दाखवले म्हणून ते उबाठा शिवसेनेतून बाहेर पडायला तयार झाले. संजय राऊत यांनी या खासदारांना २५-५० कोटी मिळाले असेही आरोप केले. हे आरोप याआधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची मोठी फळी शिवसेनेतून बाहेर पडली तेव्हाही झाले. पुढील काही काळ ५० खोके एकदम ओके असे आरोप होत राहिले. डिवचण्यासाठी, चिडवण्यासाठी आरोप ठीक आहेत. नरेटिव्ह तयार करायलाही ठीक आहेत, पण त्यामुळे वास्तव लपत नाही.

या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदारही उबाठा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत. त्यांची सविस्तर प्रतिक्रिया किंवा त्यांची या पक्ष सोडण्यामागील भूमिका समोर आली नसली तरी काही वाक्यांतून त्यांनी आपली भूमिका थोडक्यात मांडली आहे. २० जूननंतर ते आपली सविस्तर भूमिका व्यक्त करणार आहेत.
ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय तेच वास्तव आहे. आपल्याला कोणताही निधी मिळत नव्हता, सत्तेत नसल्यामुळे हात रिकामे होते. या रिकाम्या हातांनी आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तरी कसं करावं, हा त्यांचा सवाल आहे. शिवाय, ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आजारी असतात त्यामुळे त्यांनी आमच्यासारख्यांच्या भेटीसाठी मतदारसंघात येणे अशक्य असेलही पण आदित्य ठाकरे यांनी तरी आमच्या मतदारसंघात येऊन खासदारांना, आमदारांना बळ द्यायला हवे होते. पण तेही आले नाहीत. ओमराजेंची ही उद्विग्न करणारी प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.

एकीकडे स्वतः उद्धव ठाकरे आपल्या अनेक भाषणात हे म्हणाले आहेत की, माझ्याकडे देण्यासारखे काहीही नाही. माझे हात रिकामे आहेत, माझे चिन्ह, माझा पक्ष, माझे वडीलही चोरण्यात आले आहेत. तर मी तुम्हाला काय देऊ शकतो? पण तुम्ही माझ्यासोबत आहात ना. उद्धव ठाकरे यांची हीच भूमिका कदाचित या सगळ्या लोकप्रतिनिधींना बुचकळ्यात टाकणारी असावी. जर आपला नेताच आपल्याला काही देऊ शकत नाही, तो आपल्याला आधारही देऊ शकत नाही, आपल्याला बळ देऊ शकत नाही, तर आपण रिकाम्या हातांनी आपल्या मतदारसंघात काम तरी कसे करावे? या विवंचनेत जर ओमराजेंसारखा खासदार पडला असेल आणि त्यातूनच त्याने हे पक्ष सोडण्याचे पाऊल उचलल्यास नवल नाही. तसे पाहायला गेले तर ओमराजे यांना आपल्या पक्षाच्या काही भूमिका पटल्या नव्हत्या. ईव्हीएमवरून जे आरोप केले जात होते, त्याला ओमराजे यांनी कधीही दुजोरा दिला नाही. आपण ईव्हीएमवरच जिंकलो, मग ईव्हीएममध्ये दोष आहे असे आपण कसे काय म्हणू शकतो, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीररित्या घेतली होती. तेच ओमराजे आता ही स्पष्ट भूमिका मांडत आहेत.

आदित्य ठाकरेंकडे त्यांचा रोख आहे, तो काही नवा नाही. मागे महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतरही मातोश्रीवर खासदार गेले होते. तेव्हाही त्यांनी हीच तक्रार केली होती की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आमच्या मतदारसंघात फिरकले नाहीत. ती तक्रार खरीच होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मुंबईतील मतदारसंघातच फिरताना पाहायला मिळाले. मुंबई महानगरपालिकेलाच त्यांनी पहिले प्राधान्य दिले. बाकी राज्यभरातील महानगरपालिकात उबाठाला तोळामासा यश मिळाले. त्यांची मदार ही मुंबई महानगरपालिकेवरच होती. त्यासाठी त्यांनी सोबत राज ठाकरे यांनाही घेतले. पण त्यातून फारसे काही हाती लागले नाही. नगरपालिका निवडणुकीतही ठाकरे कुटुंब बाकी मतदारसंघात फिरकले नाही. महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या बातम्या मीडियात बराच काळ आल्या पण उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढलाच नाही. या सगळ्याचे परिणाम नक्कीच या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेवर झालेला आहे. आपला नेताच जर मैदानात उतरत नसेल तर काय करायचे, हा प्रश्न त्यांना पोखरत असेल.

आता भलेही या खासदारांना तुडवा, त्यांना शेण फासा वगैरे तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातील. पण प्रश्नांच्या मूळाशी कुणी जाणार की नाही? त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या वाटा तुडवल्या असत्या तर कदाचित हे खासदार पक्षाशी बांधले गेले असते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराला येतील, ते एका वेळी एवढ्या प्रचारसभा कशाला घेतात, त्यांच्याच चेहऱ्यावर निवडणुका भाजपाला लढवाव्या लागतात, असे टोमणे उबाठा पक्षाकडून अनेकवेळा मारले गेले. पण नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या त्या कष्टांमुळेच त्यांच्या पक्षाची विविध ठिकाणी सत्ता आली हे विसरून कसे चालेल. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जर फिरणार नसतील, मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधणार नसतील तर पक्षाला यश तरी कसे मिळणार? त्यातून निराश होऊन जर लोकप्रतिनिधींना दुसऱ्या पक्षाची वाट धरावी वाटत असेल तर त्यात त्यांची काय चूक आहे. ओमराजे म्हणत आहेत की माझ्याकडे निष्ठा आहे, पण मतदारसंघात जाताना निष्ठेचं करायचं काय? हाती निधी नाही, सत्ताही नाही लोकांना काय उत्तर द्यायचं, तोंड दाखवायचं तरी कसं? हा त्यांचा मुद्दा योग्यच आहे.

हे ही वाचा:

अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनात आमूलाग्र बदल हवाय!

अमेरिकेच्या निर्बंधांवर इराण आक्रमक!

वडील आजारी, तरी देशासाठी झुंजतोय मेसी!

शेअर बाजारात जिओची एंट्री

खरे तर मीडियाने उद्धव ठाकरे यांच्याभोवती जे भासमय वातावरण तयार केले, त्याचा त्यांना मोठा फटका बसला. उद्धव ठाकरे म्हणजे बेस्ट मुख्यमंत्री, जगात त्यांच्या नावाचे ढोल वाजत आहेत, एवढेच नव्हे तर देशाचे पंतप्रधानही ते होऊ शकतात, हे चित्र मीडियाने काही वर्षांपूर्वी उभे केले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक संकटे महाराष्ट्रावर आली पण त्यावेळी उद्धव ठाकरे मैदानात उतरले नाहीत, हे या लोकप्रतिनिधींनी पाहिलेले आहे. मंत्रालयातही ते गेले नाहीत किंबहुना, त्यांचा संवाद हा ऑनलाइनच होता. हा तुटलेला संवादच त्यांच्या या लोकप्रतिनिधींना दूर घेऊन जाणारा ठरला आहे.
एका मीडियाच्या चर्चेत असे म्हटले जात होते की, आम्ही उद्धव ठाकरेंची बाजू मांडली, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे कुणीही प्रवक्ते आता या खासदारांच्या बंडाच्या मुद्द्यावर बोलायला येत नाहीत. एकही प्रवक्ता आमच्या चॅनलला फिरकत नाही. मग आम्ही काय एकतर्फी चर्चा रंगवायची का? भाजपा, एकनाथ शिंदेची शिवसेना या पक्षांचे प्रवक्ते जातीने हजर असतात, आपली भूमिका मांडतात पण उबाठा शिवसेनेचे कुणीही प्रवक्ते येत नाहीत, त्यांना आग्रह करूनही येत नाहीत. ही तक्रार या मीडियाची आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, संजय राऊत सकाळी पत्रकार परिषदा घेतात, तेव्हा आम्ही त्या पत्रकार परिषदा सविस्तर दाखवतो, पण त्यापलिकडे उबाठाची भूमिका सांगण्यासाठी प्रवक्तेच नसतात. मग कशी काय त्यांची भूमिका समोर येणार. हेही खरेच आहे. राजकीय वाटचालीत संपर्कच महत्त्वाचा असतो. ती भूमिका प्रकर्षाने समोर यावी लागते. आता खासदार फुटले आहेत तर त्यामागे उबाठा शिवसेनेची काय भूमिका आहे, हे समोर येताना दिसत नाही. संजय राऊत जे बोलतात, तीच भूमिका दिसते. यामुळेच उबाठा शिवसेनेची पक्षावरची पकड ढिली होत गेली.

एकनाथ शिंदे वेगळे झाले तेव्हा आमदारांचे म्हणणे होते की, आम्ही भेटण्याची वेळ मागितली तर उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते, त्यांना भेटणे मुश्किल होते. उद्धव ठाकरेंच्या त्याच भूमिकेमुळे घात झाला. आपण बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहोत, बाळासाहेबांचा वारसा आपल्याला आहे, मग हे आमदार, खासदार जाणार कुठे असा विचार उद्धव ठाकरेंनी केला असावा, पण शेवटी या खासदार, आमदारांनी भावनिक विचार करायचे सोडून, राजकीय विचाराला प्राधान्य दिले. आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवायची असेल तर पक्षनेतृत्वाकडून होत असलेले दुर्लक्ष किती काळ सहन करायचे, असा विचार करूनच हे लोकप्रतिनिधी वेगळे झाले आहेत, हे विसरता येणार नाही.

आता खासदारांच्या बंडाच्या बातम्या येऊ लागल्यावर मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत, ज्यांना महायुतीत पश्चात्ताप झाला आहे, त्यांनी बाहेर पडून उबाठा शिवसेनेची वाट धरावी असा आग्रह संजय राऊत यांनी धरला होता. पण दुर्दैवाने त्या उघडलेल्या दरवाजातून होते ते खासदारच निघून गेले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा