केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. यात मध्यमवर्गीय, युवा, महिला, शेतकरी अशा सर्वांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच पर्यटन, आरोग्य, कृषी अशा सर्वच क्षेत्रांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतानाच महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही एकनाथ शिंदे यांनी मानले.
हे ही वाचा :
अर्थमंत्र्यांनी परिधान केलेल्या साडीतून झाला मधुबनी कलेचा सन्मान!
यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणार!
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त!
महिला सक्षमीकरणाला बळ! महिला, SC/ST उद्योजकांसाठी २ कोटी रुपयांच्या मुदत कर्जाची घोषणा
शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे असल्याचही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.