देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला, युवा, शेतकरी, वैद्यकीय क्षेत्र, सर्वसामान्य लोकांसाठी मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वात मोठी घोषणा म्हणजे १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून आभार. मोदी सरकारने मध्यमवर्गासाठी स्वप्नवत असे बजेट दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आता १२ लाख उत्पन असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, याचा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना, नवतरुणांना होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हे उत्पन्न खर्च केल्यामुळे देशात मागणी वाढणार आहे. याचा फायदा देशातील एमएसएमई क्षेत्राला होणार आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. या अर्थसंकल्पामध्ये अतिशय धीराने घेतलेला हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
शेती क्षेत्रासाठी १०० जिल्ह्यांमध्ये शेती क्षेत्राचा विकास करण्याची योजना आणली जाणार आहे. तसेच तेलबियांचे उत्पादन झाल्यानंतर केंद्र सरकार १०० टक्के खरेदी हमीभावाने करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळणार आहे. मच्छिमारांनाही क्रेडीट मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत बिनव्याजी वाढविण्यात आली आहे. मच्छिमार बांधवांनाही याचा फायदा होणार आहे.
हे ही वाचा :
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त!
महिला सक्षमीकरणाला बळ! महिला, SC/ST उद्योजकांसाठी २ कोटी रुपयांच्या मुदत कर्जाची घोषणा
रुग्णांसाठी मोठा दिलासा; कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय!
बळीराजाला दिलासा! किसान क्रेडीट कार्डवरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांवर
एमएसएमई क्षेत्रात देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राला याचा फायदा होणार असून महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल बनले आहे. स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार निर्मिती होत आहे. या स्टार्टअप्सकरता २० कोटींरुपयांपर्यंत क्रेडिट लिमिट करण्यात आली आहे याचा नवतरुणांना आणि स्टार्ट्सअप्सना खूप मोठा फायदा होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.