राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने बुधवारपर्यंत दावोस येथे विक्रमी गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या एकूण ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) दावोस दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक आणण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौऱ्यानिमित्त अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या दिवशी ६,२५,४५७ कोटींवर गुंतवणूक करार झाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. यात ३१ करार झाले आहेत.
यानंतर दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. यात मंगळवारी झालेल्या करारांचादेखील समावेश आहे.
या सामंजस्य करारांमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक रिलायन्स समूहाची होती. पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात ते ३,०५,००० कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एकाच करारामुळे सुमारे तीन लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचा समावेश असलेल्या रिलायन्ससोबत झालेल्या करारामुळे रोजगार निर्मितीला मोठा हातभार लागणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. रिलायन्स समुहाचे अनंत अंबानी म्हणाले की, ही गुंतवणूक महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य बनवण्याच्या त्यांच्या व्हिजनचा एक भाग आहे.
यानंतर ऍमेझॉनने एक मोठी गुंतवणूक केली आहे, जी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील डेटा सेंटर्समध्ये ७१,७९५ कोटींची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीमुळे ८३,१०० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. गेल्या दोन दिवसांत, समतोल विकासाच्या उद्देशाने राज्यातील सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसह सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या एकूण करारांपैकी, औद्योगिक विभागाने ११.७१ कोटी रुपयांचे करार केले आहेत, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी रुपयांचे करार केले आहेत आणि सिडकोने ५५,२०० कोटी रुपयांचे करार केले आहेत.
हे ही वाचा :
कपिल शर्मा, राजपाल यादवसह चार कलाकारांना बिष्णोईच्या नावे धमकीचा मेल
गाडीने उडवल्याने ११ जणांचा मृत्यू!
प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर
गोहत्या थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी!
महाराष्ट्र सरकारने ज्या इतर कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले त्यामध्ये सीईएटी, व्हीआयटी सेमिकॉन्स, टाटा ग्रुप, रुरल एनहान्सअर्स, पॉवरीन एनर्जी, ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज, ई-लर्निंग सोल्युशन्स, ग्रिता एनर्जी, वर्धन लिथियम, इंडोरोमा, सोतेफिन इंडिया, ब्लॅकस्टोन, लार्सन अँड टर्बो, इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लि., एमएसएन होल्डिंग्स लिमिटेड, हजेरो इंडस्ट्रीज, टेमासेक कॅपिटल मॅनेजमेंट, हिरानंदानी ग्रुप, ऍमेझॉन इ. आहेत.