अमेरिकेतील आघाडीची रिअल इस्टेट टेक कंपनी ओपनडोअरने भारतातील आपले संपूर्ण कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे सुमारे २५० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. कंपनीने भारतातील आपले ऑपरेशन्स गुंडाळण्यास सुरुवात केली असून हैदराबाद आणि बंगळुरू येथील टीम्सवर याचा थेट परिणाम होणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काझ नेजातियन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशातून या निर्णयाची माहिती दिली.
ओपनडोअर ही अमेरिकेतील डिजिटल रिअल इस्टेट व्यवहार क्षेत्रातील मोठी कंपनी मानली जाते. घरांची खरेदी-विक्री अधिक सोपी आणि वेगवान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या कंपनीने काही वर्षांपूर्वी भारतात विस्तार केला होता. मात्र आता कंपनीने आपली व्यवसाय रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या मते, तिचे बहुतांश ग्राहक अमेरिकेत असल्याने महत्त्वाच्या सेवा आणि निर्णयप्रक्रिया ग्राहकांच्या जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतातील अनेक जबाबदाऱ्या आधीच अमेरिकेत हलवण्यात आल्या होत्या आणि आता उर्वरित कामकाजही तेथेच केंद्रित केले जाणार आहे.
हे ही वाचा:
टॅरिफचा महसूल गेला वाहून! अमेरिकेचा सीमाशुल्क महसूल प्रथमच नकारात्मक
तेलसंकटात भारताचा मास्टरस्ट्रोक!
ममतांना दणका; राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांचा राजीनामा
होर्मुझजवळ जहाजावरील हल्ल्यानंतर दोन भारतीय खलाशी ठार; मुख्य अभियंता बेपत्ता
कंपनी सध्या ‘ओपनडोअर २.०’ या नव्या धोरणावर काम करत आहे. या धोरणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन आणि अधिक कार्यक्षम व्यवसाय मॉडेलवर भर दिला जात आहे. कमी मनुष्यबळात अधिक काम करण्याच्या उद्देशाने अनेक प्रक्रिया स्वयंचलित करण्यात येत आहेत. परिणामी भारतातील अनेक पदांची गरज कमी झाली असून कंपनीने अखेर संपूर्ण भारतीय ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत, सेव्हरन्स पॅकेज, करिअर मार्गदर्शन आणि नवीन नोकरी शोधण्यासाठी सहाय्य दिले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. काही कर्मचारी संक्रमण प्रक्रियेदरम्यान मर्यादित कालावधीसाठी कंपनीसोबत राहतील, तर बहुतांश कर्मचाऱ्यांना लवकरच कंपनीचा निरोप घ्यावा लागणार आहे.
विशेष म्हणजे, ओपनडोअरने यापूर्वीही अनेक वेळा कर्मचारी कपात केली आहे. २०२२ मध्ये कंपनीने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १८ टक्के म्हणजेच ५५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्यानंतरही कंपनीने खर्च कमी करण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी विविध पुनर्रचना कार्यक्रम राबवले. आता भारतातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय हा त्याच मालिकेतील सर्वात मोठा टप्पा मानला जात आहे.
जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्या AI आणि ऑटोमेशनकडे वेगाने वळत असताना त्याचा परिणाम रोजगार क्षेत्रावरही दिसून येत आहे. ओपनडोअरच्या या निर्णयामुळे भारतातील २५० हून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन रोजगाराच्या शोधात उतरावे लागणार असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या पुनर्रचनेचे हे आणखी एक मोठे उदाहरण ठरत आहे.







