मुंबई पोलिसांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. चेंबूर आरसीएफ येथून ७ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती, दरम्यान शनिवारी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकाने मुंबई , नवीमुंबई आणि ठाण्यातील काही भागातून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.
मुंबईसह राज्यभरात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण खूप वाढले आहे. कित्येक घुसखोर बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्राचा आधारे भारतीय असल्याचे पुरावे तयार करून वर्षानुवर्षे मुंबई,पुणे, ठाणे, नवी मुंबई इत्यादी शहरात वास्तव्यास आहेत. तसेच या घुसखोरांकडून सरकारी योजनांना लाभ घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड देखील झाले आहे.
मुंबई पोलिसांसह राज्यातील इतर पोलीसांकडून मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून धक्कादायक माहिती समोर आली तसेच त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बोगस पत्रावरून या बांगलादेशी नागरिकांनी भारतातील निवडणुकांमध्ये मतदान केल्याचे देखील समोर आले आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत
दिल्ली निकालाची जागतिक माध्यमांनी घेतली दखल
१३ फेब्रुवारीनंतर ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री !
छत्तीसगडच्या साई टंगरटोली गावातील ग्रामस्थांनी इस्लाम स्वीकारला !
या घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात मोहीम तीव्र करण्यात आलेली असून मुंबई पोलिसांनी या घुसखोर बांगलादेशी नागरिकाना अटक करण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांचे एक विशेष पोलीस पथक गठीत करण्यात आले असून या पथकाने शनिवारी नवीमुंबईतील कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण, मुंब्रा मुंबईतील शिवडी दारुखाना, मानखुर्द, चेंबूर इत्यादी ठिकाणाहून १६ बांगलादेशी घुसखोराना अटक केली आहे. या घुसखोराकडून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. मुंढे यांनी दिली आहे.