शुक्रवारी (४ जुलै) रात्री उशिरा बिहारची राजधानी पाटण्यातील गांधी मैदान परिसरात अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी भाजप नेते आणि प्रख्यात उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळ्या घालून हत्या केली. ही हत्या सहा वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा गुंजन खेमका यांच्या हत्येची आठवण करून देते, ज्याची डिसेंबर २०१८ मध्ये अशाच पद्धतीने गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमका रात्री ११ वाजताच्या सुमारास बंकीपूर क्लबहून रामगुलाम चौकातील त्यांच्या निवासस्थानी परतले. ते त्यांच्या गाडीतून उतरताच एका हल्लेखोराने त्यांच्यावर जवळून गोळीबार केला आणि दुचाकीस्वार पळ काढला. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर, बिहारचे डीजीपी बिनय कुमार यांनी पाटणा पोलिसांना विशेष कार्य दल (एसटीएफ) आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडून मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पाटणा शहर एसपीच्या म्हणण्यानुसार, “खेमका गाडीत असताना हल्लेखोरांनी ९ एमएम बोरच्या अनेक गोळ्या झाडल्या. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारेकऱ्याला पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.”
गोपाल खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका हे जीके कॉटन मिलचे मालक होते. २० डिसेंबर २०१८ रोजी बिहारमधील हाजीपूर औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कारखान्याच्या गेटजवळ दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या प्रकरणातही न्याय अद्याप अपूर्ण आहे.
हे ही वाचा :
संभल अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान मोदी अर्जेंटीना दौऱ्यावर
पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च सन्मान!
‘भारताने फक्त पाकिस्तानलाच नाही तर तीन देशांना हरवले’
दरम्यान, या हत्येबाबत बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव (राजेश रंजन) यांनी घटनास्थळी पोहोचून नितीश सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “बिहार गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे! नितीशजी, कृपया बिहारला माफ करा.”
दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “गुंजन खेमका यांची हत्या सात वर्षांपूर्वी झाली होती. मी त्यावेळी कुटुंबाला न्यायाचे आश्वासन दिले होते. जर सरकारने त्यावेळी कठोर कारवाई केली असती तर आज गोपाळ खेमका यांची हत्या झाली नसती.”
गोपाळ खेमका यांच्या हत्येचा त्यांच्या मुलाच्या हत्येशी संबंध असू शकतो का?, की काही व्यावसायिक शत्रुत्वाचा परिणाम आहे?, याचा तपास आता पोलिस करत आहेत. एकाच कुटुंबात जवळजवळ एकाच पद्धतीने झालेल्या दोन हत्या बिहारच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. एसआयटी व्यतिरिक्त, सीआयडी आणि एसटीएफ पथके सक्रिय आहेत, परंतु शहरात दहशतीचे वातावरण आहे.
