पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटीना दौऱ्यावर गेले असून ही भेट अर्जेंटीना राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली यांच्या निमंत्रणावरून झाली आहे. या दौऱ्याचा उद्देश जागतिक दक्षिणेसोबत भारताचे संबंध दृढ करणे आणि दक्षिण अमेरिका खंडातील या देशासोबत द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणे हा आहे. एझेइझा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट ऐतिहासिक मानली जात आहे, कारण गेल्या ५७ वर्षांत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी अर्जेंटीना दौरा केलेला नव्हता.
अर्जेंटीना मध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “द्विपक्षीय दौऱ्यासाठी ब्यूनस आयर्समध्ये आलो आहे. अर्जेंटीनासोबतचे संबंध बळकट करण्यावर या दौऱ्याचा भर असेल. राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली यांची भेट घेण्यास व त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यास उत्सुक आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी देखील ‘एक्स’वर लिहिले की, “शाश्वत मैत्रीचा उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटीना दौऱ्यावर ब्यूनस आयर्समध्ये पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही ५७ वर्षांतील पहिली द्विपक्षीय भेट असून भारत-अर्जेंटीना संबंधांमध्ये एक नवा अध्याय जोडणारी आहे.
हेही वाचा..
पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च सन्मान!
आषाढी वारीतील घुसखोरी म्हणजे हिंदू धर्मावरील छुपे संकट
‘भारताने फक्त पाकिस्तानलाच नाही तर तीन देशांना हरवले’
दोन तज्ज्ञांचा बळी घेणारे ते पाशवी हात कोणाचे ?
राष्ट्राध्यक्ष जेव्हियर माइली यांच्या आमंत्रणावरूनच पंतप्रधान मोदी अर्जेंटीना दौऱ्यावर गेले आहेत. या दोन्ही नेत्यांची शेवटची भेट नोव्हेंबर २०२४ मध्ये ब्राझीलमधील रिओ दि जानेरियो येथे झालेल्या जी-२० शिखर संमेलनात झाली होती. यापूर्वीही पंतप्रधान मोदी २०१८ मध्ये जी-२० संमेलनात सहभागी होण्यासाठी अर्जेंटीना गेले होते. पाच देशांच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वीच्या आपल्या निवेदनात मोदींनी अर्जेंटीनाला लॅटिन अमेरिकेमधील एक महत्त्वाचा आर्थिक भागीदार व जी-२० मधील निकटचा सहयोगी म्हणून संबोधले होते.
भारत व अर्जेंटीना यांच्यात अनेक क्षेत्रांत दीर्घकालीन व दृढ संबंध आहेत, जे काळानुसार अधिक मजबूत झाले आहेत. २०१९ मध्ये या संबंधांना “रणनीतिक भागीदारी”चे स्वरूप देण्यात आले होते आणि २०२४ मध्ये दोन्ही देशांनी आपले ७५ वर्षांचे राजनैतिक संबंध साजरे केले. दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान मोदी अर्जेंटीनाचे महान स्वातंत्र्य सेनानी आणि राष्ट्रीय नायक जनरल जोस डे सैन मार्टिन यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण करतील.
या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील रणनीतिक भागीदारी अधिक दृढ होण्याची आणि विविध क्षेत्रांत – जसे की व्यापार व गुंतवणूक, आरोग्य व औषधनिर्मिती, संरक्षण व सुरक्षाव्यवस्था, खनिज संपत्ती, शेती व अन्नसुरक्षा, हरित ऊर्जा, डिजिटल नवोपक्रम, आपत्ती व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षण आणि लोक-जन संपर्क – नवे सहकार्याचे मार्ग खुला होण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधानांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा अर्जेंटीना आपल्या अर्थव्यवस्थेत मोठे सुधार सुरू करत आहे – जे काही प्रमाणात भारताने पूर्वी केल्या गेलेल्या सुधारणांशी साधर्म्य साधतात.
या दौऱ्याआधी पंतप्रधान मोदी घाना आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा यशस्वी दौरा करून आले आहेत. अर्जेंटीनानंतर ते ब्राझीलला जाणार असून, प्रथम रिओ दि जानेरियो येथे ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होतील आणि नंतर ब्रासिलिया येथे द्विपक्षीय भेट देतील. या दौऱ्याचा शेवटचा टप्पा नामीबियामध्ये असेल.
