पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी आहेत. त्रिनिदादच्या राष्ट्रपती क्रिस्टीन कांगालू यांनी पंतप्रधान मोदींना स्वतःच्या हातांनी ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ प्रदान केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी या पुरस्काराबद्दल राष्ट्रपती क्रिस्टीन आणि पंतप्रधान कमला प्रसाद यांचे आभार मानले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आता पंतप्रधान मोदींकडे २५ देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. दरम्यान, या दौऱ्यापूर्वी घानामध्ये पंतप्रधानांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्याच्या एक दिवस आधी, त्रिनिदादचे पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते आणि त्यांना सन्मानित करण्याची घोषणा केली होती. स्थानिक सरकारच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींना हा सन्मान त्यांच्या जागतिक नेतृत्वासाठी, भारतीय डायस्पोराशी असलेल्या त्यांच्या सखोल संबंधांसाठी आणि कोविड-१९ दरम्यान त्यांच्या मानवतावादी मदतीसाठी देण्यात आला आहे.
हा सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान दोन्ही देशांमधील शाश्वत आणि खोल मैत्रीचे प्रतीक आहे. ते म्हणाले, “सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केल्याबद्दल मी त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकार आणि जनतेचे आभार मानू इच्छितो. १४० कोटी भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.”
हे ही वाचा :
दोन तज्ज्ञांचा बळी घेणारे ते पाशवी हात कोणाचे ?
मुंबईत बनावट पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र प्रकरणात दोघांना अटक
गोरक्षक संग्राम ढोले पाटलांच्या चतुरपणामुळे बोधेगावातील गोहत्येची झाली पोलखोल
‘शिवाजी महाराजांची स्वराज्याची लढाई पेशव्यांनी १०० वर्षे चालवली!’
त्रिनिदाद संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी भारतीय डायस्पोराच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील खोल संबंधांबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, १८० वर्षांपूर्वी भारतीय लोक एका दीर्घ आणि कठीण प्रवासानंतर या भूमीवर आले होते आणि त्यांनी कॅरिबियन आणि भारतीय संस्कृतीला जोडले होते. इतकेच नाही तर, पंतप्रधान मोदींनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला नेतृत्वाचे कौतुकही केले. ते म्हणाले, “या देशाने दोन हुशार महिला नेत्यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणून निवडले आहे. त्या अभिमानाने स्वतःला भारतीय डायस्पोराच्या मुली म्हणतात आणि त्यांच्या वारशाचा अभिमान आहे.”
