१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया एआय १७१ बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताचा प्राथमिक अहवाल आठवड्याभरात अपेक्षित आहे. तपास पथकाकडून घातपातासह सर्व शक्यतांचा विचार करण्यात येत आहे. अपघाताला एका महिन्याचा काळ आता लोटल्यामुळे आधी व्यक्त करण्यात आलेल्या बऱ्याच शक्यता आता मोडीत निघाल्या आहेत. तांत्रिक बिघाडाच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता दिसते आहे. हे कारण जर प्रत्यक्षात आले, तर बोईंगच्या प्रतिष्ठेला, अर्थकारणाला मोठा धक्का बसू शकेल. बोईंग विमानांना पाच वर्षांपूर्वी झालेल्या दोन भीषण अपघातानंतर या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचा दावा वारंवार करण्यात येत आहे. असा दावा कऱणाऱ्या दोन व्हीसल ब्लोअरचा आजवर संशयास्पद मृत्यू झाला आहे.
