केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (४ जुलै) नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, खडकवासला, पुणे येथे ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण’ संपन्न झाले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवा बाजीराव यांचा इतिहास सांगितला.
गुलामीच्या काळरात्रीत आशेचा किरण जगवणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. स्वराज्याच्या संस्काराचे उगम स्थान म्हणजे पुण्याची भूमी. १७ व्या शतकात इथूनच स्वराज्याचा आलेख तंजावूर ते अटक आणि अटक ते कटक पर्यंत पोहोचला.
जेव्हा इंग्रजांसमोर लढण्याची जनतेची वेळ आली तेव्हा लोकमान्य टिळकांनी सिंहगर्जना केली, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. पेशवा बाजीराव यांचे देशभरात अनेक ठिकाणी पुतळे बसविण्यात आले आहेत, माझ्या गावातही आहे. पण पेशवा बाजीराव यांचा पुतळा बसविण्याचे योग्य ठिकाण हे एनडीएमध्ये आहे, असे माझे मत आहे. कारण येणाऱ्या काळात भारतीय सेनेचे तीनही प्रमुख या ठिकाणाहून प्रशिक्षित होवून, पेशवा बाजीराव यांची प्रेरणा घेवून बाहेर पडतील तेव्हा भारतीय सीमेला अनेक वर्षे कोणी हात लावण्याचे धाडस करणार नाही, असा माझा विश्वास आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, बाजीराव पेशव्यांनी २० वर्षात ४१ युद्ध लढले आणि यामध्ये एकही युद्ध ते हारले नाहीत. एका वर्षात दोन युद्ध, त्यावेळी पावसाळ्याच्या चार महिन्यात युद्ध होत नसत. त्यामुळे ८ महिन्यात दोन युद्ध आणि प्रत्येक वेळी जिंकणे ही मोठी गोष्ट आहे.
मराठी साम्राज्याचे जेव्हा दोन तुकडे झाले तेव्हा पहिले बाळाजी विश्वनाथ भट्ट आणि त्यानंतर नंतर श्रीमंत बाजीराव हे पेशवा बनून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मशालीला पुढे नेण्याचे काम केले. बाजीराव पेशव्यांच्या मृत्युच्या १० वर्षाच्या आतच तंजावूर ते अफगानिस्तानपर्यंत तिथून बंगालपासून अटकपर्यंत एक विराट हिंदवी स्वराज्याची स्थापना, जे शिवाजी महाराजांची कल्पना होती ते करण्याचे काम केले गेले.
त्यामुळे अनेक जण बोलतात की, शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची सुरु केलेली लढाई पेशव्यांनी १०० वर्षे चालविली, जर तसे केले नसते तर आज भारताचे मूळ स्वरूप वाचलेच नसते. बाजीराव असे एक व्यक्ती होते ज्यांचा जन्मच घोड्यांसोबत झाला. जेव्हा माझ्या मनात निराशेचा विचार येतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवा बाजीराव माझ्या नजरेसमोर येतात आणि ती निराशा निघून जाते, असे गृहमंत्री शाह म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना वयाच्या १९-२० व्या वर्षी पेशवेपदाची वस्त्रे दिली. आपल्या २० वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी ४१ लढायांमध्ये अपराजित राहून मराठा साम्राज्याचा काबूलपासून बंगालपर्यंत विस्तार केला. ‘वेग’ हेच त्यांच्या रणनीतीचे बलस्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्ययज्ञातून जन्मलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे इतिहासातील सर्वांत यशस्वी लढवय्यांपैकी एक होते.
काळाच्या ओघात काही इंग्रज आणि स्वकीय इतिहासकारांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याला दुर्लक्षित केले, मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या थोर नायकांचा इतिहास उजळून निघत आहे. नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीसारख्या संस्थेत त्यांचा पुतळा उभारला जाणे नक्कीच सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असे गौरवोदगार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचेदेखील आभार मानले.
हे ही वाचा :
मराठी माणसाला लक्षात आले असेल ठाकरेंचा दुटप्पीपणा!
मणिपूर: २१ इन्सास रायफल, २६ एसएलआरसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त!
टॉयलेटमध्ये फ्लश झाला दिल्लीत २६/११ घडवण्याचा कट ?
प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांच्या मातोश्रींनी बॉम्बे जिमखान्यात लगावला ‘हास्यषटकार’
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. डॉ. मेधा कुलकर्णी, आ. रविंद्र चव्हाण, भारतीय लष्कराच्या सी-सदर्न कमांडचे, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, (पीव्हीएसएम) (एव्हीएसएम), नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंह, माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते.
